न्यूयॉर्क : दिनांक २१ डिसेंबर २०१७. वेळ - रात्री ११.२० वाजताची. टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी ‘आय लव्ह ट्विटर’ असं ट्विट केले. मस्क यांच्या या ट्विटला उत्तर देताना अमेरिकन पत्रकार डेव्ह स्मिथ यांनी, ‘मग ट्विटर खरेदी का करत नाही?’ असा प्रश्न विचारला. त्यावर मस्क यांनी याची किंमत किती आहे अशी विचारणा केली. आता या ट्विटच्या ५२ महिन्यांनंतर, अर्थात २५ एप्रिल २०२२ रोजी मस्क हे ट्विटरचे मालक बनलेत.
मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर डेव्ह स्मिथ यांनी ५२ महिन्यांपूर्वी मस्कसोबत झालेल्या चर्चेचा स्क्रीनशॉट शेअर केला. ‘ही चर्चा मला सतत छळत आहे’ असं ते म्हणाले. त्यानंतर स्मिथ यांच्या ट्विटर हँडलवर २ तासातच ३.६० लाखांहून जास्त लोकांनी त्या स्क्रीनशॉटला लाइक केलेय. एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना हा करार माझ्यासाठी अभिमानाचा क्षण नाहीये असं डेव्ह स्मिथ म्हणाले. तर तुमच्यामुळे हा करार झाला का? असा प्रश्न अन्य युजरने विचारला असता, त्यावर स्मिथ यांनी थेट माफी मागितली, अजून एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना या करारामुळे मी आनंदी नसल्याचंही ते म्हणालेत.
इलॉन मस्क मालक बनताच ट्विटरला रामराम
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क लोकप्रिय माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवे मालक बनताच हॉलिवूड अभिनेत्री जमीला जमीलने ट्विटरला रामराम ठोकलाय. मस्क यांच्याकडे मालकी गेल्यानंतर ट्विटर सोडणारी ती पहिली सेलिब्रिटी आहे. ट्विट करताना जमीलाने लिहिले- ‘हे माझे शेवटचे ट्विट असेल असे मला वाटते. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर हे मुक्त भाषण व्यासपीठ नरक प्लॅटफॉर्ममध्ये बदलेल आणि यामुळे अराजक द्वेष, धर्मांधता आणि दुराचार पसरला जाईल,’ अशी भीतीही जमीलाने व्यक्त केलीये. मस्क यांनी ट्टिटर ताब्यात घेतल्यानंतर ट्टिटरच्या समभागांनी उसळी घेतली आहे.