Join us

अदानींवरील विश्वास परतला; 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी झेप, मार्केट कॅप 11 लाख कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 4:27 PM

गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील दहा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी झेप पाहायला मिळत आहे.

जानेवारी महिन्यात हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविरोधात रिपोर्ट सादर केल्यानंतर अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर एका झटक्यात खाली आले. पण, आता समूह हळुहळू या मोठा हानीतून सावरत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात(शुक्रवारी) समूहातील दहा कंपन्या मोठी झेप घेतली. या वाढीमुळे गौतम अदानी यांच्या लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप यावर्षी फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच 11 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

अबू धाबी नॅशनल एनर्जी पीजेएससी (TAQA) भारतातील व्यवसाय दुप्पट करू पाहत आहे. यासाठी थर्मल जनरेशनपासून स्वच्छ ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजनपर्यंत विस्तारलेल्या गौतम अदानी यांच्या व्यवसायात मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत आहे. ही माहिती मीडियामध्ये येताच अदानी समूहातील दहा कंपन्यांचे शेअर्स वधारले.

या बातमीमुळे अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अदानी पॉवर, एसीसी, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी झेप पाहायला मिळाली. अदानी पॉवरचे शेअर्स शुक्रवारी 12 टक्क्यांहून अधिक वाढीसह 321 रुपयांवर पोहोचले आणि एकूण बाजार भांडवल 1.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. दुसरीकडे, अदानी ग्रीन एनर्जीने दिवसभरात 1.6 लाख कोटी रुपयांच्या एकूण मार्केट कॅपसह सुमारे 10% वाढ नोंदवली.

अदानी समुहातील प्रमुख अदानी एंटरप्रायझेसने 7 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली, यामुळे मार्केट कॅप 3 लाख कोटींच्या जवळ गेले. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने जवळपास 5 टक्क्यांची वाढ नोंदवून मार्केट कॅप 1.8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नेला. याशिवाय, अदानी एनर्जी सोल्युशन्सने 9 टक्के वाढ नोंदवल्यामुळे मार्केट कॅप 1 लाख कोटींच्या जवळपास गेले.

गुंतवणूकदारांचा विश्वास परतलागुंतवणूकदार अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना हिंडेनबर्ग रिपोर्टकडे दुर्लक्ष करत आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशननंतर GQG च्या पोर्टफोलिओमध्ये प्रवेश करणारी अदानी पॉवर ही गौतम अदानी यांच्या पोर्ट-टू-एनर्जी ग्रुपमधील चौथी संस्था होती.

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकपैसा