Join us

टाटा, मिस्री यांच्यात मूल्यांकनावरून संघर्ष, कलह अटळ; १३ अब्ज डॉलरची तफावत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 5:26 AM

Tata & mistry News : दोन्ही समुहातील मूल्यांकनाची तफावत मोठ्या प्रमाणावर असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही समुहांना दीर्घ वाटाघाटी आवश्यक असल्याचे इनगव्हर्न रिसर्च सर्व्हिसेसचे संस्थापक श्रीराम सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : टाटा उद्योगसमूह आणि अब्जाधीश पालनजी मिस्री यांच्या नेतृत्वाखालील शापूरजी पालनजी (एसपी) समूह  यांच्यात आता टाटा सन्सच्या समभागांच्या मूल्यांकनावरून संघर्ष झडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, दोन्ही समुहातील मूल्यांकनाची तफावत मोठ्या प्रमाणावर असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही समुहांना दीर्घ वाटाघाटी आवश्यक असल्याचे इनगव्हर्न रिसर्च सर्व्हिसेसचे संस्थापक श्रीराम सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे.टाटा उद्योग समूहातील मिस्री यांच्या हिस्सेदारीचे मूल्यांकनात दोघांनी वेगवेगळे केले असून त्यात तब्बल १३ अब्ज डॉलरची तफावत येत आहे.  टाटा सन्समध्ये मिस्त्री समूहाची १८.४ टक्के हिस्सेदारी असून, तिचे मूल्य ८० हजार कोटी रुपये (१०.९ अब्ज डॉलर) आहे, असे टाटांचे वकील हरीश साळवे यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. टाटा सन्समधील हिस्सेदारीच्या बदल्यात टाटा समूहातील सूचिबद्ध कंपन्यांतील २४ अब्ज डॉलरची हिस्सेदारी स्वीकारण्याचे शापूरजी पालनजी समूहाने मान्य केले आहे, असेही साळवे यांनी सांगितले. हिस्सेदारीची अदलाबदली करताना समभागांच्या मूल्यांकनावरून दोन्ही समूहांत कलह होणे अटळ असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. हा भारतीय औद्योगिक इतिहासातील सर्वांत मोठा विवाद ठरण्याची शक्यता आहे.  टाटांनी काढलेली समभागांची किंमत एसपी समूह मान्य करणार नाही, असे जाणकारांनी सांगितले. एसपी समूहास सध्या पैशांची गरज असल्याचेही सूत्रांनी सांगितले. एसपी समूह आणि टाटा समूह यांच्यातील संघर्षास २०१६ मध्ये सुरुवात झाली होती. 

मार्ग काढण्यासाठी दीर्घ वाटाघाटी आवश्यक  सल्लागार संस्था इनगव्हर्न रिसर्च सर्व्हिसेसचे संस्थापक श्रीराम सुब्रमण्यन यांनी सांगितले की, हे अपेक्षेप्रमाणेच घडले आहे. दोन्ही समूहांनी केलेल्या मूल्यांकनातील तफावत इतकी मोठी आहे की, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना दीर्घ वाटाघाटी कराव्या लागतील.  

टॅग्स :टाटाव्यवसाय