पेटीएमची (Paytm) लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. मोबाईल रिचार्जपासून ते FASTag पेमेंटपर्यंत अनेक गोष्टी त्याद्वारे करता येतात. अशा परिस्थितीत, रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या रिलीझनंतर पेटीएम युझर्समध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांना त्यांच्या कारमध्ये बसवलेला पेटीएम फास्टॅग आणि त्यांच्या वॉलेटमधील पैशांची चिंता सतावू लागली आहे.
बुधवारी रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करत त्यांची सेवा प्रतिबंधित करण्यास सांगितलं होतं. पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड २९ फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहक खाते, वॉलेट आणि FASTag मध्ये ठेवी/टॉपअप स्वीकार केलं जाणार नसल्याचं त्यात म्हटलं होतं. तेव्हापासून पेटीएम वापरकर्त्यांमध्ये अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ.
कंपनीच्या फाऊंडरचं म्हणणं काय?
याप्रकरणी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून माहिती दिली. 'प्रिय पेटीएम युझर्स, तुमचं आवडते ॲप काम करत राहील. १९ फेब्रुवारीनंतरही आम्ही त्याच पद्धतीनं काम करत राहू. पेटीएम टीमच्या सर्व सदस्यांसह मी तुम्हाला सलाम करतो. प्रत्येक समस्येवर एक उपाय असतो आणि आम्ही देशसेवा करण्याचा संकल्प केला आहे,' असं ते म्हणाले.
यापुढे पेटीएम चालणार का?
जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर हो असं आहे. तुम्ही पेटीएम अॅप आणि युपीआयचा वापर करू शकता. पेटीएम पेमेंट बँकेच्या ट्रान्झॅक्शनवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पेटीएमची सेवा सुरू राहील.
Paytm Wallet करु शकता पोर्ट?
जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तुम्ही त्या पैशांनी रिचार्ज किंवा पेमेंट करू शकता.
वॉलेटमध्ये पैसे भरता येतील का?
सध्या पेटीएम वॉलेटमध्ये असलेल्या पैशांचा वापर करू शकता. तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक अकाऊंटचा वापर करू शकणार नाही.
वॉलेटमधून पैसे काढू शकता का?
सध्या असलेले पैसे तुम्ही वॉलेटमधून सहज काढू शकता. पेटीएम वॉलेटच नाही, तर पेटीएम बँक अकाऊंटमध्ये असलेलेही पैसे सहजरित्या काढू शकता. यासाठी १५ मार्चपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.