लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : युद्धाच्या झळा अधिक तीव्र झाल्याने सोने-चांदीची चकाकी पुन्हा वाढली आहे. सोमवारी सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ते थेट ५३ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तर चांदीच्याही भावात २,७०० रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजार ७०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
रशिया व युक्रेन यांच्यातील तणावामुळे गेल्या महिन्यापासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यात आता दोन आठवड्यापासून तर अधिकच वाढ होत असून सोमवारी तर सोने-चांदी उच्चांकीवर पोहचले आहे. नऊ दिवसात सोने ३,००० रुपये प्रति तोळ्याने वधारले आहे.
२६ फेब्रुवारी सोने ५०,७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात २८ फेब्रुवारी रोजी ८०० रुपयांची वाढ होऊन ते ५१,५००
रुपयांवर पोहचले होते.
कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर लॉकडाऊन काळातही सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्या वेळी जुलै ते ऑगस्ट २०२०मध्ये सोने ५५ हजारावर पोहचले होते. त्यानंतर मात्र ते कमी-कमी होत गेले. आता पुन्हा युद्धामुळे सोने ५४ हजाराच्या जवळ पोहचले आहे. तसेच त्या वेळी चांदी ७७ हजारावर पोहचली होती. आता ती पुन्हा ७१ हजारांच्या पुढे गेली आहे.
९ दिवसांत चांदीत ६२०० रुपयांनी वाढ
९ दिवसात तर चांदी सहा हजार २०० रुपयांनी वधारली आहे. २६ फेब्रुवारी रोजी ६५ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात २८ फेब्रुवारी रोजी एक हजाराने वाढ होऊन ती ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. त्यानंतर चांदीच्या दरात सतत वाढ होत गेली आहे.