कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे चाक तात्पुरते थांबले असले तरी लसीकरणाचा जोर वाढल्यानंतर अर्थव्यवस्थेतील सर्व महत्त्वाचे घटक पुन्हा बहरू लागले आहेत. बांधकाम क्षेत्र हे त्यापैकी एक. आजच्या घडीला अनेक घरे बांधून तयार आहेत. मात्र, मागणी कमी असे चित्र आहे. घरांच्या किमती घसरू लागल्या असून बँकांचे व्याजदरही कमी आहेत. हाच मुहूर्त आहे घर घेण्याचा...
व्याजदर कमीगेल्या महिन्यात अनेक बँका व गृहवित्त संस्थांनी त्यांच्या व्याजदरात घट केली. नव्या घरांची मागणी वाढू लागली असून ती कायम रहावी या उद्देशाने व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यातच बिल्डरांकडूनही विविध आकर्षक सवलती जाहीर केल्या जात आहेत. म्हणूनच हीच योग्य वेळ आहे नवे घर घेण्याची, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
घरांच्या किमती वाढतील?मागणी वाढल्याने घरांच्या किमती लगेचच वाढतील, असे नाही.बिल्डरांनाही त्यांच्या मालाची विक्री जास्त व्हावी असे वाटत असल्याने किमती तूर्तास तरी स्थिर राहतील, असा अंदाज आहे. देशभरात ६० शहरांमध्ये १२ लाख ५० हजार घरे विनाविक्री पडून आहेत.
का वाढत आहे घरांची मागणी?
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ऑक्टोबर, २०२० ते मार्च, २०२१ या कालावधीत घरांच्या मागणीत वाढ झाली. स्टॅम्प ड्युटीत झालेली घट, बिल्डरांकडून दिल्या जात असलेल्या सवलती आणि कमी व्याजदर हे घटक त्यासाठी कारणीभूत ठरले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मात्र परत घरांच्या मागणीत घट झाली. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून, विशेषत: लसीकरणाचा वेग वाढल्यावर, पुन्हा घरांची मागणी वाढू लागली आहे. गृहबांधणी क्षेत्र अर्थव्यवस्थेतील मोठा घटक असून त्यामुळे अनेक रोजगारनिर्मिती होते. म्हणूनच सरकारनेही या क्षेत्राला अधिकाधिक सवलती देऊ करत मागणी वाढण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार केले आहे.
हीच योग्य वेळमागणी आणि पुरवठा योग्य पातळीवर आहे. व्याजदरही ऐतिहासिक नीचांकावर आहेत. व्याजदर कमी असल्याने मोठ्या रकमेचे कर्ज घेता येऊ शकणार आहे. तसेच ईएमआयही कमी राहणार आहे. या सर्व अनुकूल बाबींमुळे घर घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.