लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यंदाच्या सणासुदीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असून, दसरा, नवरात्रीच्या पहिल्याच आठवड्यात ई-कॉमर्स कंपन्यांनी तब्बल ४७ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभापर्यंत खरेदीचा हा सुसाट वेग कायम राहणार असून, रिटेल बाजारात ३१ डिसेंबरपर्यंत थोडाथोडका नव्हे, तर ८.५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
सणासुदीसोबतच लग्नाचाही मोसम सुरू होत असून, त्यामुळेही उलाढाल वाढेल. ६० कोटी ग्राहक खरेदी करतील, असा अंदाज आहे. उल्लेखनीय म्हणजे यंदा चिनी मालाला बाजारात उठाव नाही. सोबतच, ऑनलाइनपेक्षा शेजारील दुकानांतून खरेदीचे प्रमाण अधिक राहील, असे संकेत आहेत. ई-कॉमर्स कंपन्या ९० हजार कोटी रुपयांचा, तर खुल्या बाजारातून होणारी उलाढाल त्यापेक्षा ९ पट अधिक राहील, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले.
काय घेतले लोकांनी?
रेडसीर कंपनीने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, या उत्सवी हंगामात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर १५ ऑक्टोबरला संपलेल्या पहिल्याच आठवड्यात ४७ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि मोठे साहित्य यांची सर्वाधिक विक्री झाली. यंदा १९ टक्क्यांनी ही उलाढाल वाढली.
जे ग्राहक आधी चिनी साहित्य मागायचे ते आता देशी साहित्याला पसंती देत आहेत. राखी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या सणासुदीत ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. लग्नाच्या हंगामात ४.२५ लाख कोटी रुपये व ख्रिसमससह नववर्षारंभापर्यंत १.२५ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल. यामुळे देशाच्या चिल्लर व्यावसायिकांना मोठी उभारी मिळेल, तसेच अर्थव्यवस्थादेखील मजबूत होईल. - प्रवीण खंडेलवाल, महामंत्री, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स