लखनौ - केंद्र सरकारच्या परवानगीनंतर सोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकानं उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे तीनतेरा वाजलेले दिसले. दारूच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतराचे नियम लोकांनी धाब्यावर बसवल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सोमवारी अहवाल तयार केला आणि दुकानांमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून दारू विक्रीची वेळ वाढवण्याचा प्रस्ताव दिला. तब्बल ४० दिवसांनंतर दारुची दुकाने उघडल्याने वाईन शॉपच्या बाहेर तोबा गर्दी झाली होती. त्यातूनच एका दिवसातील दारुविक्रीचे रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत.
देशातील अनेक राज्यांत ४० दिवसांहून अधिक काळानंतर सोमवारी मद्याची दुकाने उघडली गेली आणि दुकानाबाहेर लोक सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे अनेक दुकानं बंद करावी लागली. त्यामुळेच दिल्ली सरकारनेही मद्यावर अतिरिक्त 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात येणार आहे. तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात दारुविक्रीने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. एका अंदाजानुसार, एका दिवसात तब्बल ३०० कोटी रुपयांची दारुविक्री झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे राजधानी लखनौ येथे ८ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली आहे. तर डझनभर जिल्ह्यांमध्ये ५ कोटी रुपयांची दारुविक्री झाल्याची माहिती आहे.
सकाळी दुकाने खुली होण्यापूर्वीच दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे काही दारु दुकानातील दारु संध्याकाळपर्यंत संपली होती. त्यामुळे, दुकाने वेळेआधीच बंद करण्यात आली. दारुची विक्री आणि नियमांचे पालन होत आहे की नाही, याचा तपशील घेण्यासाठी स्वत: मुख्य सचिव संजय आर भुसरेड्डी आणि मालमत्ता कर आयुक्त पी. गुरुप्रसाद पोहोचले होते.
कदाचित HIV अन् डेंग्यूप्रमाणे कोरोनावरही लस उपलब्ध होणार नाही, शास्त्रज्ञांचा दावा
दरम्यान, दारुच्या दुकानावरील गर्दी आणि दारुची मागणी लक्षात घेता दुकानदारांना एका व्यक्तीस जास्तीत जास्त ७५० एमएल दारु विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर ३७५ एमएल बीअरच्या दोन बाटल्या देण्याची परवानगी आहे. दरम्यान, युपी सरकारला पहिल्याच दिवसाच्या दारुविक्रीतून १०० कोटींचा कर मिळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.