नवी दिल्ली : २०१७-१८ या वर्षात तब्बल चार दशकांत प्रथमच ग्राहक खर्चात घसरण झाली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मागणी घटल्याचा हा परिणाम असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. जाणकारांनी सांगितले की, देशात गरिबी असल्याचे उपभोग खर्चातील घसरणीने दिसून येते. ग्रामीण बाजारावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेत अजूनही मागणीची उणीव आहे, हेही सर्वेक्षणातील निष्कर्षातून स्पष्ट होते.
सर्वेक्षण अहवालानुसार, २०१७-१८मध्ये ग्रामीण भागात ग्राहक खर्च ८.८ टक्क्यांनी घसरला आहे. शहरी भागात मात्र तो २ टक्क्यांनी वाढला आहे. जुलै २०१७ आणि जून २०१८ या काळात एनएसओने हे सर्वेक्षण केले आहे. हा अहवाल जारी करण्याची मंजुरी एका समितीने १९ जून २०१९ रोजीच दिली आहे. तथापि, त्यातील प्रतिकूल तथ्यांमुळे हा अहवाल रोखण्यात आला आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार हा सर्वेक्षण अहवाल जून २०१९ मध्ये जाहीर व्हायला हवा होता.
>गरीब लोकसंख्येत किमान १०% वाढ
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडिज अँड प्लॅनिंगचे सहयोगी प्राध्यापक हिमांशू यांनी सांगितले की, मागील ४० वर्षांत उपभोग खर्च (कंझम्प्शन एक्स्पेंडिचर) कधीही घसरला नव्हता. तो प्रथमच घसरला आहे. गरिबीच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे या डाटातून स्पष्टपणे दिसून येत आहे. आकडेवारीवरून असे दिसते की, गरिबीतील लोकसंख्येत किमान १० टक्क्यांची वाढ झाली आहे. हिमांशू यांनी सांगितले की, याआधी १९७२-७३ मध्ये उपभोग खर्च घसरला होता. जागतिक पातळीवर तेलाचे संकट निर्माण झाल्यामुळे ही स्थिती तेव्हा उद्भवली होती. १९६० च्या दशकाच्या मध्यात देशांतर्गत अन्न संकटामुळे उपभोग खर्च घसरला होता.
तब्बल चार दशकांत प्रथमच झाली ग्राहक खर्चात घसरण
२०१७-१८ या वर्षात तब्बल चार दशकांत प्रथमच ग्राहक खर्चात घसरण झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:06 AM2019-11-16T04:06:28+5:302019-11-16T04:06:35+5:30