Join us

'YES' यू कॅन... बँकेवरील निर्बंध उठले, ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 7:13 PM

येस बँकेच्या संचालक मंडळास ५ मार्च रोजी बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरील निर्बंध उठवले आहेत.

नवी दिल्ली - निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या येस बँकेत खातेदारांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसह ७२ नागरी बँकांच्या एक हजार कोटींहून अधिक ठेवी आणि अल्पमुदतीच्या कर्जाची रक्कम अडकली आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय) बँकेवरील निर्बंध उठविल्यामुळे बँकांवरील ‘पत’अडचण आता दूर होईल. तब्बल १३ दिवसांनंतर येस बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यामुळे, आता सर्वच खातेदारांना आपल्या खात्यातून ५० हजारांपेक्षा जास्तीची रक्कम काढता येणार आहे. तसेच, इतर बँकींग सेवेचाही लाभ ग्राहकांना मिळेल. 

येस बँकेच्या संचालक मंडळास ५ मार्च रोजी बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरील निर्बंध उठवले आहेत. सरकारने  येस बँकेसाठी नवीन धोरण आखले असून प्रशांत कुमार यांना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रशांत कुमार यांनी बँकेकडे रोकड कमी नसून सर्वच एटीएम फुल्ल असल्याचे मंगळवारीच सांगितले होते. तसेच बँकेच्या ऑनलाईन सेवाही सुरळीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, आज सायंकाळी ६ वाजल्यापासून ग्राहकांना आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि एटीएम सेवा वापरता येणार आहेत. तसेच, ५० हजार रुपयांपेक्षाही जास्त रक्कम काढता येईल. त्यामुळे, येस बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे बँकेतून ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कमच काढता येणार होती. या बँकेमधे ७२ नागरी सहकारी बँकांचे तब्बल साडेतीनशे कोटी रुपये अडकले आहेत. तसेच, राज्य सहकारी बँकेनेदेखील ‘कॉलमनी’अंतर्गत तब्बल सातशे कोटी रुपये अल्प मुदतीने येस बँकेस दिले आहेत. हे कर्ज ५ टक्के वार्षिक व्याजानुसार देण्यात आले होते. राज्य बँकेने ५ मार्च रोजी हे कर्ज दिले होते. त्याच दिवशी संध्याकाळी आरबीआयने बँकेवर निर्बंध घातले. बँकेची मोठी रक्कम अडकण्याचा धोका होता. येस बँकेची आर्थिक स्थिती खराब असूनही कर्ज वितरण केल्याप्रकरणी बँकेचे महाव्यवस्थापक सुनील कदम यांना निलंबित करण्यात आले आहे. स्टेट बँक आॅफ इंडिय ७,२५० कोटी आणि एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सीस व महिंद्रा बँक मिळून ३,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे आरबीआयने येस बँकेवरील निर्बंध येत्या १८ तारखेला उठविण्याचे जाहीर केले आहे. परिणामी, सहकारी बँकांसह इतर खातेदार आणि ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहकांना दिलासा देत, खातेदारांची अनामत रक्कम सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. तसेच, देशातील सर्वच बँका सुरक्षित असून खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकींग व्यवस्था सुरक्षित असल्याचा दावा दास यांनी केला आहे.  

टॅग्स :येस बँकभारतीय रिझर्व्ह बँकमुंबईएटीएम