Join us

राज्यांच्या योगदानातूनच होणार ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 3:17 AM

पंतप्रधान मोदी : गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन

धरमशाला (हिमाचल प्रदेश) : इ.स. २०२५ पर्यंत भारताला ५ लाख कोटी (५ ट्रिलियन) डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी प्रत्येक राज्य आणि प्रत्येक जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या योगदानानेच हे उद्दिष्ट गाठता येऊ शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

हिमाचल प्रदेश सरकारने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘रायझिंग हिमाचल ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट’ या नावाने एका परिषदेचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त ते बोलत होते. घरबांधणी क्षेत्राला बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, यामुळे गृहनिर्माण क्षेत्र सक्रिय होईल आणि प्रत्येक कुटुंबाला घर ही योजना यशस्वी होऊ शकेल.मोदी यांनी सांगितले, प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यात मोठी क्षमता आहे. भारताला ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी या क्षमतेचा वापर व्हायला हवा. प्रत्येक राज्य आणि जिल्हा याकामी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.आपल्या ३० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. सध्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बहुतांश सर्वच राज्ये एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. हिमाचल प्रदेशातील पर्यटन, औषधनिर्माण आणि इतर काही क्षेत्रांत गुंतवणूक आणण्याची मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा वापर व्हायला हवा. योग्य प्रयत्न झाल्यास या क्षेत्रांत मोठी गुंतवणूक होऊ शकते.

टॉप टेनमध्ये भारतपंतप्रधान मोदी म्हणाले, जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे २०१४ ते २०१९ या काळात भारताने व्यवसाय सुलभता निर्देशांकात तब्बल ७९ स्थानांची प्रगती केली आहे. याबाबतीत भारताची कामगिरी टॉप-१० देशांत समाविष्ट झाली आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीव्यवसाय