Join us  

स्मार्टफोन बाजारावर चिनी कंपन्यांचा ताबा

By admin | Published: January 05, 2017 2:34 AM

भारतात शिपमेंट क्षेत्रातील ५१ टक्के स्मार्टफोन बाजारावर चिनी कंपन्यांनी ताबा मिळविला आहे. चिनी कंपन्यांच्या घोडदौडीमुळे जागतिक बाजारातील सॅमसंग आणि अ‍ॅपल यांसारख्या मातब्बर

नवी दिल्ली : भारतात शिपमेंट क्षेत्रातील ५१ टक्के स्मार्टफोन बाजारावर चिनी कंपन्यांनी ताबा मिळविला आहे. चिनी कंपन्यांच्या घोडदौडीमुळे जागतिक बाजारातील सॅमसंग आणि अ‍ॅपल यांसारख्या मातब्बर कंपन्यांना हादरे बसत आहेत. भारतीय कंपन्यांनाही मोठा फटका बसला आहे. नोटाबंदीचा परिणामही या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. ओप्पो, विवो, शिओमी, लेनोवो आणि जिओनी या कंपन्यांकडून भारतात अत्यंत आक्रमक मार्केटिंग सुरू आहे. त्याचा लाभ या कंपन्यांना सातत्याने मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये शिपमेंटच्या माध्यमातून विक्री झालेल्या स्मार्टफोनपैकी ५१ टक्के स्मार्टफोन वर नमूद केलेल्या चिनी कंपन्यांचे होते. अ‍ॅपलच्या शिपमेंटमध्ये लक्षणीय घट झाली असून सॅमसंगच्या शिपमेंटमध्ये घसरण झाली आहे. हाँगकाँगस्थित काउंटरपॉइंट रिसर्च या कंपनीने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली. कंपनीचे संशोधक संचालक नील शाह यांनी सांगितले की, चिनी कंपन्यांचा भारतातील स्मार्टफोन बाजारातील हिस्सा ५१ टक्के झाला असतानाच भारतीय कंपन्यांचा एकत्रित हिस्सा २0 टक्क्यांच्या खाली गेला आहे. आदल्या वर्षी याच काळात तो ४0 टक्क्यांपेक्षा जास्त होता. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात भारतीय कंपन्यांच्या स्मार्टफोनची विक्री ५0 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात घसरली आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय आणि चिनी कंपन्यांचा वाटा समसमान ३४ टक्के होता. सॅमसंग आणि अ‍ॅपलसह जागतिक पातळीवरील कंपन्यांचा वाटा ३२ टक्के होता. आॅक्टोबरमध्ये हे चित्र बदलले. चिनी कंपन्यांची हिस्सेदारी वाढून ४७ टक्के झाली. नोव्हेंबरमध्ये आणखी ४ टक्क्यांनी वाढून ती ५१ टक्के झाली. याच काळात अ‍ॅपल व सॅमसंगचा बाजार हिस्सा ३ टक्क्यांनी घसरला. भारतीय कंपन्यांचा आॅक्टोबर-नोव्हेंबरमधील बाजारहिस्सा १८ टक्के होता. सॅमसंगचा सप्टेंबर अखेरीस २२.६ टक्के बाजारातील हिस्सा होता. नोव्हेंबरमध्ये तो जवळपास तेवढाच राहिला. अ‍ॅपलची विक्री मात्र अध्याने घटली. (लोकमत न्यूज नेटवर्क )