नवी दिल्ली : मे महिन्यात किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही क्षेत्रांतील महागाई घटली असली, तरी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईबाबतच्या चिंता आणि अनिश्चितता अजून कायम असल्याचे म्हटलेले आहे. त्यामुळे महागाई पुन्हा परत येऊ शकते का, अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत. जूनचे पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा धोरणात्मक व्याजदरांत बदल केला नाही. मात्र, नंतर दास यांनी सूचक वक्तव्य करताना म्हटले की, ‘महागाईवर अर्जुनासारखी एकाग्र नजर ठेवणे आवश्यक आहे. महागाई अजूनही ४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. प्रवासाचा शेवटचा टप्पा नेहमीच कठीण असतो.’
आयात महाग झाल्यास...
अल् निनोमुळे खरिपाच्या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाल्यास यंदा गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, शेंगदाणा, ऊस, सोयाबीन, यांसह कांदे व भाज्यांचे उत्पादन घटू शकते. त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्य वस्तूंचे भाव वाढण्याचा धोका आहे. त्यातच आयात महाग झाल्यास सरकारला काहीच करता येणार नाही.
‘अल् निनो’चा धोका
‘इंडियन चेंबर ऑफ फूड अँड अग्रीकल्चर’चे चेअरमन डॉ. एम. जे. खान यांनी सांगितले की, अल् निनो प्रभावामुळे रिझर्व्ह बँकेने महागाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. अल् निनोमुळे पाऊस कमी पडतो. त्यामुळे तांदूळ, साखर आणि डाळींचे उत्पादन घटू शकते.
धान्याच्या किमतींनी वाढविले टेन्शन
अन्नधान्ये व डाळींच्या किमती कमी करण्यासाठी सध्या सरकार संघर्ष करीत आहे. गहू व तांदळाच्या किमती ५ ते ६ टक्के, तसेच तूर व उडीद डाळींच्या किमती ८ टक्के वाढलेल्या आहेत. सरकारी साठ्यात ८० दशलक्ष टन तांदूळ आहे. तो स्वस्त धान्य दुकानांतून देण्यात येत आहे.