नवी दिल्ली : अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसची (एलपीजी) किंमत सिलिंडर मागे २ रुपयांनी वाढविण्यात आली आहे. एलपीजीच्या किमतीत गेल्या पाच महिन्यांच्या काळात सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जेट विमानांच्या इंधनाच्या दरांत ७.३ टक्क्यांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
स्वयंपाकाच्या गॅसच्या १४.२ किलो सिलिंडरची दिल्लीतील किंमत आता ४३0.६४ रुपये झाली आहे. आधी ती ४२८.५९ रुपये होती. एलपीजीच्या दरात दर महिन्याला दोन रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय सरकारने जुलैमध्ये घेतला होता. तेव्हापासूनची ही सहावी वाढ आहे. एलपीजीवर मिळणारी सबसिडी संपेपर्यंत ही वाढ सुरू राहणार आहे. २८ आॅक्टोबर रोजी डिलरांना किमशन वाढवून देण्यासाठी १.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. तत्पूर्वी १ आॅक्टोबर रोजी २.0३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. १ सप्टेंबर रोजी सिलिंडरमागे १.९७ रुपये, १६ आॅगस्ट रोजी १.९३ रुपये आणि १ जुलै रोजी १.९८ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
विना सबसिडीच्या एलपीजीची किंमत ३७.५ रुपयांनी वाढवून ५२९.५0 रुपये करण्यात आली आहे. वर्षाचे १२ अनुदानित सिलिंडर संपल्यानंतर विना अनुदानित सिलिंडर नागरिकांना घ्यावे लागतात.
एव्हिएशन टबाईन फ्युएल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जेट विमानांच्या इंधनाची किंमत प्रति किलो लिटर ३,४३४.२५ रुपयांनी महागली आहे. त्याबरोबर एटीएफची दिल्लीतील किंमत आता ५0,२६0.६३ रुपये प्रति किलो लीटर झाली. एटीएफच्या दरात झालेली ही सलग दुसऱ्या महिन्यातील मोठी वाढ आहे.
१ आॅक्टोबर रोजी त्यात ३.११ टक्क्यांची वाढ झाली होती.
नोव्हेंबर २0१४ मध्ये डिझेलवरील सबसिडी संपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी दर महिन्याला किमतीत ५0 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याच पद्धतीने दरमहा २ रुपयांपर्यंत दरवाढ करून स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी संपविण्यात येणार आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
>रॉकेलची सबसिडीही संपवणार
रॉकेलची सबसिडीही अशीच संपविण्यात येणार आहे. प्रत्येक पंधरा दिवसाला २५ पैसे याप्रमाणे १0 महिने रॉकेलचा दर वाढविण्यात येणार आहे. जुलैपासून ही वाढ सुरू झाली. मंगळवारी रॉकेलच्या दरात आठवी वाढ करण्यात आली. आता रॉकेलचे दर मुंबईत १७.१७ रुपये झाले आहेत. दिल्लीत रॉकेलवरची सबसिडी पूर्णत: संपविण्यात आली आहे. दिल्लीत आता स्वस्त धान्य दुकानांत रॉकेल मिळत नाही.
स्वयंपाकाचा गॅस महागला
अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसची (एलपीजी) किंमत सिलिंडर मागे २ रुपयांनी वाढविण्यात आली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 06:08 AM2016-11-02T06:08:34+5:302016-11-02T06:08:34+5:30