Join us

कुलिंग चार्ज 5 रुपये आकारला, दुकानदाराला 3 हजाराचा दंड झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:33 PM

कोलते यांच्या तक्रारीची दखल घेत नागपूर येथील सहायक नियंत्रक जोशी यांनी सावनेर येथील निरीक्षक वी.आर.भडके आणि कटोल विभागाचे निरीक्षक एस.एन. मोरे यांनी संयुक्तपणे तपास केला

ठळक मुद्देकोलते यांच्या तक्रारीची दखल घेत नागपूर येथील सहायक नियंत्रक जोशी यांनी सावनेर येथील निरीक्षक वी.आर.भडके आणि कटोल विभागाचे निरीक्षक एस.एन. मोरे यांनी संयुक्तपणे तपास केला

नागपूर - जिल्ह्यातील खापरखेडा एका दुकानदारास कुलिंग चार्ज आकारणे चांगलेच महागात पडले आहे. ग्राहकाच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाने दुकानदारास 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शेखर कोलते असे जागरुक ग्राहकाचे नाव असून त्यांनी येथील दुकानातून स्नॅक्स आणि कोल्ड्रींकची खरेदी केली होती. 

शेखर हे आपल्या मित्रांसमवेत सावनेर तहसिल हद्दीतील आदासा येथील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी, तेथील अन्नपूर्णा उपहारगृह येथून स्नॅक्स आणि कोल्ड्रींक्सची खरेदी शेखर यांनी केली. मात्र, 35 रुपये एमआरपी असलेल्या बॉटलसाठी दुकानदाराने 40 रुपयांची आकारणी केली. त्यामुळे कोलते यांनी दुकानदाराशी संवाद साधला असता, दुकानदाराने हुज्जत घातली. मात्र, आधीच उशीर झाला असल्याने कोलते यांनी 40 रुपये देऊन ती बॉटल खरेदी केली. एमआरपीपेक्षा अधिक रक्कम वसुल करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी कोलते यांनी अन्नपूर्णा उपहारगृहाच्या मालकाविरुद्ध संबंधित विभागाकडे तक्रार केली. 

कोलते यांच्या तक्रारीची दखल घेत नागपूर येथील सहायक नियंत्रक जोशी यांनी सावनेर येथील निरीक्षक वी.आर.भडके आणि कटोल विभागाचे निरीक्षक एस.एन. मोरे यांनी संयुक्तपणे तपास केला. त्यानंतर दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास 3 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली. विशेष म्हणजे शेखर कोलते यांनी दुकानदारास नोटीस पाठवून नुकसानभरपाईची मागणी केली. तसेच, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे तक्रारीचा इशाराही दिला होता. त्यामुळे दुकानदाराने फंद्यात पडायला नको म्हणून शेखर यांच्या बँक खात्यात 5275 रुपये जमा केले.  

टॅग्स :गुन्हेगारीनागपूरखरेदी