अविनाश कोळी
सांगली : कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनचा काळ संगणकीय दुनियेसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. या काळात संगणकांच्या विक्रीचे नवनवे विक्रम नोंदले गेले आहेत. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार भारतात २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्येही मागील वर्षाच्या तुलनेत ३० टक्के विक्रीत वाढ झाली असून, या उलाढालीत लॅपटॉपचा हिस्सा ८१.५ टक्के इतका आहे.
‘आयडीसी’ने कॅलेंडर वर्षातील तिसऱ्या तिमाहीचा म्हणजेच जुलै ते सप्टेंबरचा एक अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार लॅपटॉप, डेस्कटॉप व कार्यालयीन संगणकांचे एकूण ४४ लाख ५५ हजार युनिट भारतात विकले गेले आहेत. यात लॅपटॉपचा वाटा ८१.५ टक्के, डेस्कटॉपचा वाटा १६.५ टक्के तर कार्यालयीन संगणकांचा वाटा २ टक्के इतका आहे. मागील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीची तुलना करता संगणकांची उलाढाल ३० टक्क्यांनी वाढली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’च्या संकल्पनेतून लॅपटॉपच्या मागणीत वाढ झाली. शिक्षणासाठीही याचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. २०२० मध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ३४ लाख २७ हजार संगणकांची विक्री झाली होती. संगणकांच्या ऑनलाइन विक्रीचा आकडाही वाढत आहे. तिसऱ्या तिमाहीत यंदा ७ लाख ७१ हजार युनिट पाठविण्यात आले. ऑनलाइन मार्केट कंपन्यांसाठी हा आजवरचा सर्वांत मोठा विक्रम आहे.
पुरवठ्यावर परिणाम
n देशातील लॅपटॉपची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, मागणी विचारात घेतल्यास तुलनेने पुरवठा कमी आहे. बाजारातील मोठ्या तीन कंपन्या लॅपटॉपचा पुरवठा करताना धडपडत आहेत. या तफावतीमुळे बाजारातील उलाढालीत कमी हिस्सा असलेल्या कंपन्यांना फायदा झाला आहे.
n संगणकाच्या उलाढालीचा आलेख गेल्या पाच महिन्यांपासून वर सरकत आहे, मात्र शाळा, महाविद्यालये, कार्यालये आता ऑफलाइन सुरू होत असल्याने पुढील तिमाहीमध्ये संगणकांच्या मागणीत घट होण्याचा अंदाज आहे.