संयुक्त राष्ट्रे : कोरोना विषाणूमुळे भारतीय व्यापारास ३४८ दशलक्ष डॉलरचा फटका बसला असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. याशिवाय कोरोनामुळे चीनमध्ये वस्तू उत्पादन क्षेत्रात निर्माण झालेल्या मंदीचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १५ अर्थव्यवस्थांत भारताचा समावेश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘संयुक्त राष्ट्रे व्यापार व विकास परिषद’ने कोरोना विषाणूचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणामांचा आढावा घेणारा एक अहवाल जारी केला . त्यात ही माहिती दिली आहे.
चीनमधील उत्पादन ठप्प झाल्याने सर्वाधिक नुकसान झालेल्या पहिल्या १५ देशांत भारताचा समावेश असला तरी युरोपीय संघ, जपान व द. कोरिया यांच्या तुलनेत भारतावरील परिणाम कमी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला ३४८ दशलक्ष डॉलरचा फटका बसला आहे. इंडोनेशियाला फटका ३१२ दशलक्ष डॉलरचा आहे. भारताच्या रासायनिक क्षेत्राला १२९ दशलक्ष डॉलरचा, तर वस्त्रोद्योग व परिधान क्षेत्राला ६४ दशलक्ष डॉलरचा फटका आहे.
वाहन उद्योगाला ३४ दशलक्ष डॉलर, इलेक्ट्रिकल यंत्रांना १२ दशलक्ष डॉलर, चामड्याच्या उत्पादनांना १३ दशलक्ष डॉलर, धातू उत्पादने २७ दशलक्ष डॉलर व फर्निचर उद्योगास १५ दशलक्ष डॉलरचा फटका बसला आहे. (वृत्तसंस्था)
>ओपेक देशांत मतभेद
व्हिएन्ना : कोरोना विषाणूमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या असून, त्याचा कसा मुकाबला करायचा यावरून तेल उत्पादक व निर्यातदार देशांची संघटना ‘ओपेक’मध्ये मतभेद झाले आहेत. व्हिएन्ना येथे गुरुवारच्या बैठकीत कोणताही निर्णय न होऊ शकल्याने शुक्रवारी पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कच्च्या तेलाच्या किमती वर ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय डिसेंबरच्या बैठकीत घेतला होता.
>आंतरराष्ट्रीय निर्यातीला ५० अब्ज डॉलरचा फटका
संयुक्त राष्ट्रांनी म्हटले की, कोविद-१९ मुळे जागतिक व्यापार विस्कळीत झाला आहे. त्यामुळे जागतिक निर्यातीत ५० अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. अचूक उपकरणे, यंत्रे, वाहने आणि दळणवळण साधने यांना सर्वाधिक फटका बसला.
कोरोनामुळे भारतीय व्यापाराला ३४८ दशलक्ष डॉलरचा फटका
कोरोना विषाणूमुळे भारतीय व्यापारास ३४८ दशलक्ष डॉलरचा फटका बसला असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:15 AM2020-03-06T05:15:54+5:302020-03-06T05:16:05+5:30