मुंबई : कोविड-१९ साथीच्या आजारामुळे चालू असलेल्या लॉकडाउनमुळे नुकत्याच संपलेल्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ८३ अब्ज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २३ टक्क्यांनी घसरून ६४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत येण्याचा जागतिक बँकेचा अंदाज आहे.
सन २०२०-२१मध्ये दक्षिण आशियातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा दर २२.१० टक्क्यांनी घसरून ११९ अब्ज अमेरिकन डॉलर होईल, असा अंदाजही जागतिक बँकेने वर्तविला आहे. या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. सन २०२०-२१ मध्ये पाकिस्तानात एफडीआयचा प्रवाह २२.५० दशलक्ष डॉलर्स, बांगलादेश १८.५० दशलक्ष डॉलर्स, नेपाळ ८.१० दशलक्ष डॉलर्स, श्रीलंका ६.७० दशलक्ष डॉलर्स आणि अफगाणिस्तानात ०.९० दशलक्ष डॉलर्स असेल, असे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.
युरोप आणि मध्य आशियासारख्या जगातील अनेक क्षेत्रात एफडीआय कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये युरोप व मध्य आशिया २७.५० टक्के, आफ्रिका २३.१० टक्के, दक्षिण आशिया २२.१० टक्के, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका १९.६० टक्के, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन १९.३० टक्के आणि पूर्व आशिया आणि पॅसिफिक १३ टक्के या देशांचा समावेश आहे.
>लॅटिन अमेरिकन देशांवर होणार परिणाम
कोविड-१९ या महामारीमुळे अमेरिका आणि ब्रिटनमधील एफडीआय खाली येईल, तर कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतीमुळे मध्य पूर्व आणि आखाती देशातील सहकारी देशामधील (जीसीसी) एफडीआय खाली येणार आहे. थेट परकीय गुंतवणुकीतील घसरणीचा परिणाम भारत आणि बऱ्याच लॅटिन अमेरिकन देशांवर होणार आहे. परिणामी नोकरी व रोजगाराचे नुकसान विशेषत: ग्रामीण भागात होणार आहे. भारतातील सर्वांत मोठी समस्या शहरी भागातून आपल्या गावी परत आलेल्या ५० ते ६० दशलक्ष प्रवासी कामगारांची असेल.
कोरोनामुळे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये घट
२०१९-२० या आर्थिक वर्षात भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ८३ अब्ज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २३ टक्क्यांनी घसरून ६४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत येण्याचा जागतिक बँकेचा अंदाज आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 03:53 AM2020-04-29T03:53:14+5:302020-04-29T03:53:38+5:30