मुंबई - लॉकडाऊनच्या ४ थ्या टप्प्यात केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानंतर अनेक उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. सरकारने आयटी कंपन्यांसह काही उत्पादित कंपन्यांनाही परवानगी दिली आहे. मात्र, कंपनीतील कामगार, कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी काही नियम बंधनकारक केले आहेत. तरीही, नोकिया कंपनीच्या तामिळनाडूतील प्लँटमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील नावाजलेल्या मोबाईल कंपनीत सर्व सुविधा पुरवल्यानंतरही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भावाची चिंता वाढली आहे.
नोकिया कंपनीने तामिळनाडू येथील उत्पादित प्लँटमध्ये ४२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, हा प्लँट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी चिनी कंपनीचा स्मार्टफोन असलेल्या ओप्पो मोबाईल कंपनीतही ९ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर कंपनीने पुढील आदेशापर्यंत कंपनीचा प्लँट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कंपनीतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्याचा निर्णयही कंपनीने घेतला. लॉकडाऊनकालावधीत ८ मे नंतर कंपनीने कामकाज पूर्ववत सुरु केले होते.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्ताच्या हवाल्याने, नोकियाने गेल्याच आठवड्यात तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथील प्लँट सुरु केला होता. मात्र, कंपनीतील काही कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतरच कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली. कंपनीकडून अद्याप कोरोना पॉझिटीव्ह कर्मचाऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. मात्र, रॉयटर्सने ४२ कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याचे प्रकाशित केले आहे. नोकियाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन प्लँट सुरु केला होता. मात्र, काही कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने आता पुन्हा हा प्लँट बंद करण्यात आला आहे. तरीही, लवकरच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह प्लँट पुन्हा सुरु होईल, असे कंपनीने म्हटले आहे.