मुंबईः कोरोना व्हायरसचा शेअर बाजाराला आज मोठा झटका बसला आहे. शेअर बाजार बंद होत असताना निर्देशांकात 1448.37 अंकांची घसरण नोंदवली गेली असून, सेन्सेक्स 38297.29 अंकांवर बंद झाला आहे. तर निफ्टीसुद्धा 11201.75 अंकांवर स्थिरावला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पाहायला मिळाली होती. या घसरणीमुळे अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी, तर 6 दिवसांत 10 लाख कोटी बुडाले आहेत. गेल्या आठवडाभरात अमेरिकेच्या डाऊ जोन्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये उमटत आहेत.
शेअर बाजारातील घसरणीला प्रामुख्यानं कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अमेरिका, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या शेअर बाजारांत जागतिक स्तरावर मोठी घसरण पाहायला मिळाली. मेटल, बँका आणि ऑटो, ऑइल सेक्टरला या बाजाराचा मोठा फटका बसला आहे. एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड आणि रिलायंस इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरले आहेत. तर दुसरीकडे टायटन, एनटीपीसी, नेस्ले इंडिया आणि कोटक बँकेचे शेअर्स चांगली कामगिरी करत होते.
Sensex at 38,297.29, down by 1448.37 points. Nifty at 11,201.75, down by 431.55 points. pic.twitter.com/b0UTEfhyvQ
— ANI (@ANI) February 28, 2020
दरम्यान वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम दीर्घकाळ टीकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये ०.३ टक्क्यांनी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमधून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सोबतच मालाची आयात करणाऱ्या देशांच्या निर्यातीवरही विपरित परिणाम होणार आहे.
संबंधित बातम्या
कोरोनामुळे सौदीने पवित्र स्थळांची यात्रा केली स्थगित