Join us

Corona Virus: कोरोनामुळे पर्यटनास अब्जावधींचा फटका; आजपर्यंतचा सर्वांत मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 5:38 AM

१५ देशांतील प्रवाशांना दिल्ली विमानतळावरील करमुक्त शॉपिंग एरियात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारतीय सीमा शुल्क विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतीय पर्यटन उद्योगास अब्जावधी रुपयांचा फटका बसला आहे, असे औद्योगिक संघटना ‘सीआयआय’ने म्हटले आहे. सरकारने सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या क्षेत्राच्या नुकसानीचा आकडा खूपच मोठा असेल, असे सीआयआयने म्हटले आहे.

‘सीआयआय’च्या पर्यटन समितीने म्हटले की, भारतीय पर्यटन उद्योगास बसलेला हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा धक्का आहे. देशात येणारे आणि देशातून बाहेर जाणारे तसेच देशांतर्गत अशा सर्व भौगोलिक पर्यटन शाखांना कोरोनाचा फटका बसला आहे. याशिवाय हौस, साहस, ऐतिहासिक, जल, औद्योगिक यासारख्या सर्व प्रकारातील पर्यटन ठप्प झाले आहे. हॉटेल, प्रवास एजंट, टूर आॅपरेटर, डेस्टिनेशन्स, रेस्टॉरंट्स, कौटुंबिक मनोरंजन स्थळे यांच्यातील मूल्यसाखळी ठप्प झाली आहे. हवाई, भूतल आणि सागरी वाहतूकही ठप्प आहे.

सीआयआय पर्यटन समितीने घेतलेल्या आढाव्यानुसार, विदेशातून येणारे पर्यटक २८ अब्ज डॉलरचा व्यवसाय देतात. त्यातील ६० ते ६५ टक्के व्यवसाय आॅक्टोबर ते मार्च या कालावधीतील असतो. नोव्हेंबरमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या बातम्या यायला सुरुवात झाली. त्याबरोबर बुकिंग रद्द होण्यासही सुरुवात झाली. मार्चमध्ये भारतातील विविध ठिकाणचे ८० टक्के बुकिंग रद्द झाले आहे. त्यामुळे हजारो कोटींचा फटका उद्योगास बसला आहे.प्रवाशांना शॉपिंग एरियात प्रवेशबंदी१५ देशांतील प्रवाशांना दिल्ली विमानतळावरील करमुक्त शॉपिंग एरियात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारतीय सीमा शुल्क विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, चीन, अमेरिका, इटाली, दक्षिण कोरिया, इराण, जपान, मलेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, इंडोनेशिया, स्पेन, फ्रान्स, व्हिएतनाम, नेपाळ आणि थायलंड या देशांतील नागरिकांना दिल्ली विमानतळावरील करमुक्त शॉपिंग एरियात प्रवेश मिळणार नाही. या १५ देशांतून परतणाऱ्या भारतीयांनाही करमुक्त शॉपिंग एरियात प्रवेश दिला जाणार नाही.

टॅग्स :पर्यटनकोरोना