मुंबई - गेल्या वर्षभरापासून मंदीचा फटका झेलत असलेल्या भारतीय ऑटो सेक्टरसाठी कोरोना विषाणूमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठ्या संबंधीच्या समस्यांमुळे देशातील आघा़डीच्या ऑटो कंपन्यांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत तब्बल ४२ टक्के तर टाटा मोटर्सच्या विक्रीत सुमारे ३४ टक्क्यांनी घट झाली आहे.
नुकत्यास संपलेल्या फेब्रुवारी महिन्यात महिंद्रा अँड महिंद्राने ३२ हजार ४७६ वाहनांची विक्री केली. ही विक्री महिंद्रा अँड महिंद्राच्या गतवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत सुमारे ४२ टक्क्यांनी कमी आहे. गतवर्षी याच काळात महिंद्राने सुमारे ५६ हजार ००५ वाहनांची विक्री केली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात महिंद्राच्या प्रवासी वाहनांची विक्री १० हजार ९३८ एवढी झाली. मात्र गतवर्षी याच काळात ही विक्री 26 हजार १०९ एवढी झाली होती. तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात महिंद्राच्या व्यावसायिक वाहनांची विक्री १५ हजार ८५६ इतकी झाली. गतवर्षी याच काळात ही विक्री २१ हजार १५६ एवढी झाली होती.
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील अजून एक आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या विक्रीमध्येही फेब्रुवारी महिन्यात सुमारे ३४ टक्यांनी घट झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात टाटा मोटर्सने ३८ हजार ००२ वाहनांची विक्री केली. गतवर्षी याच काळात टाटा मोटर्सने ५७ हजार २२१ वाहनांची विक्री केली होती. ‘चीनमध्ये झालेला कोरोना विषाणूचा फैलाव आणि एका मोठ्या व्हेंडरकडे लागलेल्या आगीमुळे वाहनांचे उत्पादन आणि घाऊन विक्रीवर परिणाम झाला आहे. कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या देशांतर्गत विक्रीमध्येही ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे विविध उपकरणांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बीएस ६ ट्रांझिशन मोहिमही प्रभावित झाली आहे,’ असे टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकलच्या बिझनेस यूनिटचे अध्यक्ष मयंक पारिख यांनी सांगितले.
दरम्यान, मारुती सुझुकीच्या विक्रीतही किरकोळ घट झाली आहे. मात्र मोठा फटका बसलेल्या नाही. मारुती सुझुकीने फेब्रुवारी महिन्यात एकूण १ लाख ४७ हजार ११० कारची विक्री केली. गतवर्षी याच काळात कंपनीने १ लाख ४८ हजार ६८२ वाहनांची विक्री केली होती, असे मारुती सुझुकी इंडियाने सांगितले.
संबंधित बातम्या
म्हणून आली ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी, निर्मला सीतारामन यांनी सांगितले हे कारण
ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही: मोदी
China Coronavirus : 'कोरोना'चा कहर! जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान
Corona Virus: शेअर बाजाराला कोरोनाचा डंख; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले
टाटा आणि महिंद्राशिवाय एमजी मोटर इंडियावरही कोरोनाचा परिणा झाला आहे. कोरोनामुळे चीनमधून होणाऱ्या सुट्या भागांच्या पुरवठ्यात अडथळा आला आहे. दरम्यान, विक्रीमधील ही घट मार्चच्या पहिल्या काही आठवड्यांमध्येही सुरू राहण्याची शक्यता आहे.