मुंबई : मुंबई अथवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या अनुक्रमे सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांमध्ये अनैसर्गिक वाढ वा घट झाल्यास बाजारातील व्यवहार थांबविले जातात, याला सर्कीट ब्रेकर असे म्हणतात. आधीच्या दिवसाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत १०, १५ आणि २० टक्क्यांची वाढ अथवा घट झाल्यास सर्किट ब्रेकर कार्यरत होऊन बाजारातील समभाग तसेच डेरिव्हेटिव्हजचे व्यवहार थांबविले जातात. सेन्सेक्स अथवा निफ्टी यापैकी कोणत्याही एका निर्देशांकाला सर्किट ब्रेकर लागल्यास दोन्हीही शेअर बाजारांचे व्यवहार थांबविण्यात येतात, हे विशेष होय. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये २ जुलै, २००१पासून सकीॅट ब्रेकर लागू झाले आहेत. सप्टेंबर, २०१३मध्ये सेबीने केलेल्या सूचनांप्रमाणे त्यामध्ये काही बदलही करण्यात आले आहेत.
सर्किट ब्रेकर प्रणालीमुळे व्यवहार थांबल्याची पहिली घटना १७ मे, २००४ रोजी घडली. या दिवशी दोन वेळा बाजारात सर्किट ब्रेकर लावावा लागला. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीचा झालेला पराभव आणि डाव्या पक्षांच्या समर्थनावर संयुक्त पुरोगामी आघाडीचे येऊ घातलेले सरकार यामुळे सेन्सेक्स ८४२ अंशांनी कोसळून बाजाराला सर्कीट ब्रेकर लागला.
22/05/2006
परकीय वित्तसंस्थांची विक्री व मार्जिन मनीमुळे सेन्सेक्स १०.२% घसरून बाजाराला सर्किट ब्रेकर लागला.
17/10/2007
सेन्सेक्स ९ टक्के तर २१ जानेवारी २००८ रोजी ११ टक्के घसरून सर्कीट ब्रेकर लागले आहेत.
17/05/2009
या दिवशी बाजाराने दोन वेळा अपर सर्किट ब्रेकर गाठून इतिहासाची नोंद केली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारला स्वबळावर सत्ता मिळाल्यामुळे शेअर बाजारात निर्माण झालेल्या उत्साहामुळे बाजारात दोन वेळा अप्पर सर्किट ब्रेकर लावावा लागला होता.
अर्थव्यवस्थांना फटका बसणार
या पडझडीमुळे आधीच मंदीत असलेल्या बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्था आता अधिकच मंदावतील. त्यामुळे जगातील बहुतेक केंद्रीय बँकांनी व्याज दर लागलीच खाली आणले असले तरी याचा नजीकच्या काळात फारसा फायदा होतांना दिसणार नाही कारण वस्तूंना असलेली मागणी फारच कमकुवत आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण कमी असले तरीही देश आणि जागतिक पातळीवर योजलेल्या सावधगिरीच्या उपायांमुळे बहुतेक विभागातील वस्तू व सेवा मागणीवर नकारात्मक परिणाम होतो आहे. - जिनेश गोपानी,
हेड, इक्विटी - अॅक्सिस म्युच्युअल फंड
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी
बाजाराचे मूल्य (व्हॅल्युएशन) आता फार आकर्षक पातळीवर आहे. कोणत्याही तांत्रिक अर्थात टेक्निकल मापदंडानुसार, जसे की, ‘बाजार भांडवल भागिले जी डी पी’, किंवा ‘पी इ रेशो’, हे मूल्य आकर्षक आहे. या पातळीवर शेअर बाजार अथवा म्युक्युअल फंड इक्विटी योजनांमधून पैसे काढून घेण्याचा विचार सुद्धा करायला नको. एस.आय.पी अजिबात बंद न करता उलट त्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता त्यांची गुंतवणूक सुरु ठेवली पाहिजे अन्यथा आज जो तोटा फक्त कागदावर आहे तो प्रयत्यक्षात येईल. १४,००० निफ्टी पातळीला गुंतवणूक करण्याची ज्यांची तयारी होती त्यांनी ८००० पातळीवर गुंतवणूक करायलाच पाहिजे. - सुहास राजदेकर, गुंतवणूक तज्ज्ञ
लोअर सर्किट?
शेअर बाजारात मोठी पडझड झाल्यास लोअर सर्किट लावले जाते. अल्पावधीत सर्वच शेअर्सचे भाव गडगडल्यास लोअर सर्किट लागते. लोअर सर्किट म्हणजे एका ठराविक किमतीपेक्षा कमी दराला शेअर्स विकण्यावर बंदी घालणे होय. त्यामुळे शेअर बाजारात आणखी पडझड होत नाही.
अपर सर्किट?
शेअर बाजाराने अनपेक्षितपणे उसळी घेतल्यास अपर सर्किट लावले जाते. अपर सर्किट लागल्यानंतर प्रत्येक शेअरचा दर एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वाढविता येत नाही. शेअर बाजारामध्ये समतोल कायम राहवा म्हणून हे सर्किट लावले जाते.
या वेळेत व्यवहार पूर्णपणे बंद
शेअर बाजारातील गुंतवणूकदार तसेच दलाल यांचे प्रचंड तेजी अथवा मंदीपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने सर्किट ब्रेकर लागू केले गेले आहेत. सर्किट ब्रेकर लागल्यानंतर निर्धारित वेळेसाठी व्यवहार थांबतात. ही वेळ संपल्यानंतर शेअर बाजाराच्या कामकाजाला नेहीप्रमाणे सुरूवात होत असते. दुपारी २.३० वाजेपूर्वी सर्किट ब्रेकर लागल्यास १५ मिनिटांसाठी प्री ओपन कॉल आॅप्शन सेशन घेतले जाते.
असा ठरतो व्यवहार थांबण्याचा कालावधी
दुपारी १ वाजण्याच्या पूर्वी १० टक्कयांचा सर्कीट ब्रेकर
45 मिनिटे
दुपारी १ वाजेनंतर
मात्र २.३० वाजण्यापूर्वी १०%चा सर्कीट ब्रेकर
15 मिनिटे
दुपारी २.३० वाजेनंतर १० टक्कयांचा सर्कीट ब्रेकर
0 मिनिटे
दुपारी १ वाजण्याच्या पूर्वी १५ टक्कयांचा सर्कीट ब्रेकर
1.45 तास
दुपारी १ वाजता वा त्यानंतर
१५ टक्कयांचा सर्कीट ब्रेकर
2.45 तास