नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची भीती व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या २ वर्षांपासून अचूक भविष्यवाणी करणारे आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचं अग्रवाल यांनी म्हटलं. मात्र, देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हाँगकाँगने 24 एप्रिलपर्यंत एअर इंडियाच्याविमानांना प्रवेशबंदी केली आहे.
हाँगकाँगने 24 एप्रिलपर्यंत भारतीय विमानसेवेला वाहतूक बंदी केल्याचं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. कारण, हाँगकाँगमध्ये आलेल्या एअर इंडियातील तीन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जर यात्रा करण्यापूर्वी 48 तास अगोदर कोरोनाची चाचणी केल्याचे आणि निगेटीव्ह अहवालाचे प्रमाणपत्र असेल तरच भारतीय प्रवाशांना हाँगकाँगमध्ये प्रवेश मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच, हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतरही कोरोना चाचणी करने बंधनकारक असणार आहे.
"16 एप्रिल रोजी एअर इंडियाच्या एआय316 दिल्ली-कोलकाता-हाँगकाँग उड्डाणातील 3 प्रवाशांची COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती'', त्यामुळेच हाँगकाँग सरकारने नवी दिल्ली आणि कोलकाता येथून येणाऱ्या विमानांना भारतात प्रवेश बंदी केली आहे. दरम्यान, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे तब्बल 2 वर्षांनी म्हणजे 27 मार्च रोजीच भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू केली आहे.
प्रा. मणींद्र अग्रवाल यांचं भाकित
आतापर्यंत कोणताही नवा म्युटंट आलेला नाही. लोकांमध्ये असलेली रोगप्रतिकारशक्ती ९० टक्क्यांपर्यंत आहे. पण बेजबाबदारपणे वागल्यास म्युटंटचा प्रभाव दिसू लागेल, असं गेल्या २ वर्षांपासून अचूक भविष्यवाणी करणारे आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मणींद्र अग्रवाल म्हणाले. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जवळपास ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्तर प्रदेशात आठवड्याभरात रुग्णसंख्या १४१ टक्क्यांनी वाढली आहे. ही आकडेवारी चिंता वाढवत असताना अग्रवाल यांनी वर्तवलेल्या भाकितामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.