नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था वित्त वर्ष २०२१ मध्ये ३.२ टक्के संकोच पावेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार असल्यामुळे हा संकोच होईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेने सोमवारी ‘जागतिक अर्थव्यवस्था अंदाज अहवाल’ जारी केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा हा संकोच ३१ मार्चपर्यंतच घडून येईल. त्यापुढील वर्षात अर्थव्यवस्था वाढून ३.१ टक्क्यांनी वृद्धी पावेल. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वृद्धी घसरणार आहे. वित्तीय क्षेत्राच्या ताळेबंदावर तणावर राहील. त्याचाही प्रतिकूल परिणाम दिसून येईल. वित्तीय प्रोत्साहन उपाय आणि मौद्रिक धोरणातील सातत्यपूर्ण शिथिलता याचे अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात पाठबळ असले तरी प्रतिकूल परिणाम अटळ आहे.
फिच, एसअँडपी, गोल्डमॅन सॅश आणि यूबीएस यासारख्या बहुतांश व्यावसायिक अनुमानक संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्था वित्त वर्ष २०२१ मध्ये ५ टक्क्यांनी संकोच पावेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोना साथ आणि त्याविरोधातील लॉकडाऊनचा मोठा धक्का बसून जागतिक अर्थव्यवस्था २०२० मध्ये ५.२ टक्के संकोच पावेल, असा अंदाज आहे. जागतिक बँकेच्या ‘इक्विटेबल ग्रोथ, फायनान्स अँड इन्स्टिट्यूशन्स’ या संस्थेच्या उपाध्यक्ष सीला पजरबसिओग्लू यांनी सांगितले की, हा अंदाज अत्यंत कमजोर आहे. दीर्घ काळ टिकतील असे ओरखडे मागे ठेवून हे संकट जागतिक आव्हाने निर्माण करील, असे दिसते.
साथीच्या बाबतीत स्पेनला टाकले मागे
सोमवारी भारताने आपली अर्थव्यवस्था पुन्हा उघडी करण्यास सुरुवात केली. २५ मार्चला भारतातील लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यानंतर पहिल्या टप्प्यात प्रथमच शॉपिंग मॉल, हॉटेल आणि भोजनगृहे उघडण्यात आली. कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली असताना भारताने आपली अर्थव्यवस्था खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना साथीच्या बाबतीत स्पेनला मागे टाकून भारत पाचव्या स्थानी गेला आहे.