नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या भीतीमुळे आधीच मंदीचा सामना करीत असलेल्या भारतीय अर्र्थव्यवस्थेला आणखी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या निर्यात २ टक्क्यांनी आयात आणि ८ टक्क्यांनी घटली आहे. कोरोनामुळे पर्यटनाला फटका बसण्याबरोबरच व्यावसायिक उत्पादनांची मागणी घटून अर्थव्यवस्थेच्या चक्राची गती कमी होईल. त्यामुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) यावर्षीपेक्षा घटण्याची भीती अर्थअभ्यासकांनी वर्तवली आहे.
गेली काही महिने भारतीय अर्थव्यवस्था स्थित्यांतरातून जात आहे. आॅटोमोबाईल आणि बांधकाम क्षेत्र अडचणीतून जात असल्याची स्थिती आहे. देशाचा जीडीपीदेखील ५ टक्क्यांच्या आतमध्येच राहिला आहे. एप्रिल ते जानेवारी २०१९-२०२० या कालावधीमध्ये निर्यात १.९३ टक्क्यांनी घटून २६५.२६ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे, तर आयात ८.१२ टक्क्यांनी घटून ३९८.५३ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. निर्यातीच्या तुलनेत आयातीमधील तूट १३३.२७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
उत्पादन क्षेत्रातील मालाची निर्यात १.७ टक्क्यांनी घटली आहे. त्यातच चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे व्यापारावरील ताण आणखी वाढला आहे. भारतीय उपखंडातील विविध देशांमधे या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. परिणामी, भारतीय उपखंडातून विविध प्रकारच्या मालाची मागणी कमी होईल, असा अंदाज आहे. जागतिक व्यापार संघटनेने यावर्षी विविध मालांच्या उत्पादनाचा व्यापार २.७ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याला कोरोना विषाणूचा अडथळा येण्याची शक्यता आहे.
अर्थ अभ्यासक अदिती नायर म्हणाल्या, की क्रूड आॅईलची आयात वगळता इतर उत्पादित मालांची निर्यात घटली आहे. आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने व्यापारावर चांगलाच परिणाम होऊ शकतो. मालाच्या पुरवठ्याची साखळी यामुळे विस्कळीत होण्याचा धोका आहे. पर्यटनाबरोबरच विविध सेवा उद्योग, आयात आणि निर्यातीलादेखील फटका बसेल. यंदा भारताचा जीडीपी रेट ५ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. गेल्या ११ वर्षांतील हा नीचांकी दर आहे. या स्थितीमुळे पुढील आर्थिक वर्षाच्या जीडीपीवर देखील विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या वस्तूंना बसला फटका
च्देशामधील आयात आणि निर्यातही घटली आहे. निर्यातीमध्ये तयार कपडे (-५ टक्के), जडजवाहीर (-११.६ टक्के), अभियांत्रिकी (-४ टक्के) या क्षेत्राला चांगला फटका बसला. औषध (१२.४ टक्के वाढ), इलेक्ट्रॉनिक (३२.८ टक्के), पेट्रोलियम पदार्थ (३ टक्के), रसायने (२ टक्के) या क्षेत्राने घटत्या निर्यातीला तारले. कोळशाची आयात तब्बल २४.४ टक्क्यांनी घटली असून, सोने ३१.५ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात ४.७ टक्क्यांनी घटली. यंत्रसामग्री ४ आणि वाहतूक उद्योगाची सामग्रीची आयात २ टक्क्यांनी वाढली आहे.