- विजयकुमार सैतवाल
जळगाव : दीडशे वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी बाजार गेल्या महिन्यापासूनच कोरोनाचे परिणाम सहन करीत असून, आता तर लॉक डाऊनमुळे प्रथमच सलग २४ दिवस बाजार बंद राहणार आहे. यामुळे विवाह सोहळ्याची खरेदीही लांबणीवर पडली असून, ग्राहक व विक्रेतेही या बंदला स्वीकारत असून, ‘जान है तो जहान...’ म्हणत सोने तर केव्हाही खरेदी करू, आता घरातच बसू, असा निश्चय करीत आहे.
जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे राज्यात २३ मार्चपासून सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाउन जाहीर केल्याने १४ एप्रिलपर्यंत सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. यात सुवर्णपेढ्यादेखील आल्या. हा बंद आता होत असला तरी सुवर्ण बाजारावर गेल्या महिन्याभरापासूनच परिणाम जाणवत आहे. कोरोनामुळे मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव सतत गडगडत राहिले. त्यानंतर
मुंबईतील दुकाने बंद झाल्याने आयातच नसल्याने सोन्याचे भाव वाढू लागले. असे परिणाम होत असताना २२ रोजी जनता कर्फ्यू, २३ रोजी जमावबंदी व २४ रोजी राज्यात लॉक डाउन जाहीर झाले. त्यामुळे सुवर्णपेढ्या शनिवार, २१ मार्चनंतर उघडल्याच नाही.
सोने खरेदी
तर नंतरही होईल..
सध्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी घरात राहणेच आवश्यक असल्याने सुवर्ण व्यावसायिक व ग्राहकही त्यास पसंती देत आहेत. सोने तर नंतरही खरेदी करता येईल, असे सांगत सर्व जण या बंदचा स्वीकार करीत आहे.
जळगावला मोठी परंपरा
जळगावातील सुवर्ण बाजाराला दीडशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. येथील सोन्याला देशभरात पसंती असल्याने येथे नेहमी सोने खरेदीसाठी गर्दी असते. या दीडशे वर्षांच्या काळात विविध मागण्यांसाठी कधी चार ते पाच दिवस सुवर्ण बाजार बंद राहिला तर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीमुळे चार दिवस सुवर्ण बाजार बंद होता. त्यानंतर आता प्रथमच सलग २४ दिवस सुवर्ण बाजार बंद राहणार आहे.
मार्च महिन्यात अनेक विवाह मुहूर्त होते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे अनेकांनी ते लांबणीवर टाकले आहे. परिणामी सुवर्ण खरेदीही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता एप्रिलमध्येच पुन्हा सुवर्ण झळाळी येण्याची चिन्हे आहेत.
सुवर्ण बाजाराच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण बाजार बंद राहणार आहे. यामुळे विवाहासाठीची अनेकांची सोने-चांदी खरेदी लांबणीवर पडली आहे. असे असले तरी सध्या आपल्यासह देशवासीयांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने या बंदचा सर्व जण स्वीकार करीत आहे व आपापल्या घरी राहून एकप्रकारे देशसेवेला हातभार लावत आहे.
- स्वरूप लुंकड, सचिव,
जळगाव शहर सराफ असोसिएशन
Coronavirus : दीडशे वर्षांत प्रथमच २४ दिवस सोने बाजार बंद
coronavirus: जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे राज्यात २३ मार्चपासून सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाउन जाहीर केल्याने १४ एप्रिलपर्यंत सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. यात सुवर्णपेढ्यादेखील आल्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:22 AM2020-03-26T01:22:35+5:302020-03-26T01:24:36+5:30