नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या संसर्गामुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सोबतच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग व्यवहार बंद झाल्याने देशातील स्टार्टअप, लघू आणि मध्यम उद्योग जबरदस्त आर्थिक संकटात सापडले आहेत. लोकल सर्कलद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. एकूण 42 टक्के उद्योग सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच मोदींनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भय भारत अभियानामधूनही या उद्योगांना कुठलीही मदत मिळत नाही आहे.
या सर्वेनुसार ३८ टक्के उद्योगांकडे रोख रकमेची टंचाई निर्माण झाली आहे. तर ४ टक्के उद्योग हे लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या विविध अडचणींमुळे आपला व्यवसाय गुंडाळत आहेत. तर आपल्याकडे केवळ तीन ते चार महिने पुरेल एवढीच रोकड उरली आहे, अशी माहिती ३० टक्के उद्योगांनी दिली आहे. तर केवळ १६ टक्के उद्योगांनी आपल्याकडे पुढचे तीन ते चार महिने कामकाज चालवण्याइतपत रोकड उरली असल्याचे सांगितले. लोकल सर्कल हा एक कम्युनिटी सोशल मीडिया प्लँटफॉर्म आहे. या सर्व्हेमध्ये ८ हजार ४०० स्टार्टअप आणि उद्योगांचे २८ हजार लोक सहभागी झाले होते.
अनलॉक १ मुळे व्यवसायामध्ये काही सकारात्मक परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे. तसेच व्यवसायाची गाडी विशेष पुढे सरकताना दिसत नाही आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या उद्योगांचे प्रमाण 27 टक्क्यांवरून वाढून ४२ टक्के झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत उद्योगांचे उत्पन्न तब्बल ८० ते ९० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुढच्या काळात व्यवसाय चालवणे कठीण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी तीन लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर पँकेजची घोषणा केली होती. मात्र ५७ टक्के उद्योजकांनी याचा फायदा होईल असे वाटत नाही, असे सांगितले. तर २९ टक्के उद्योजकांनी याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे सांगितले. तसेच या कठीण काळात आपला उद्योग सुरू ठेवण्यासाठी अनेक उद्योगांनी आपल्या खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पुढच्या काळात परिस्थिती सुधारेल असे मानणाऱ्यांची संख्या एप्रिलच्या तुलनेत वाढली आहे. हीच काय ती दिलासादायक बाब आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या