मुंबई : कोरोनाच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन झालेले असतानाही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी) गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात ८९ टक्के निर्यात करण्यात यश आले आहे. जागतिक बाजारपेठेतील पुरवठा साखळी कायम ठेवण्यामध्ये याचा मोठा लाभ होत आहे. जेएनपीटी हे देशातील महत्त्वाचे कंटेनर हाताळणी केले जाणारे बंदर आहे. जेएनपीटी बंदराद्वारे २ लाख ८९ हजार २९२ टीईयूची हाताळणी करण्यात आली आहे. ही कामगिरी मे २०२०च्या तुलनेत ५.२९ टक्के अधिक आहे. जून महिन्यात १६६ मालवाहू जहाजे जेएनपीटीमध्ये आली. याद्वारे एकूण ४.०७ दशलक्ष टन मालाची हाताळणी करण्यात आली. रेल्वे आॅपरेशनमध्ये एकूण ५११ रेक्सची वाहतूक करण्यात आली. मे महिन्यात हे प्रमाण ४९९ रेक्स होते. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी याबाबत म्हणाले, जेएनपीटीद्वारे देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न असून आम्ही त्यासाठी तत्पर आहोत.पुढील काळात जेएनपीटीद्वारे होणाऱ्या कामामध्ये अधिक वाढ करण्याचा आमचा मानस आहे. सर्व स्टॉक होल्डरच्या सहकार्यातून या आर्थिक संकटातून बाहेर पडणे सर्वांना शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊन काळात व्यापार सुरळीत चालण्यासाठी जेएनपीटीने विशिष्ट कार्यप्रणाली विकसित केली आहे. एसओपीच्या माध्यमातून जेएनपीटीने कंटिन्युटी आॅफ बिजनेस प्लॅन तयार केला असून त्याद्वारे काम केले जात आहे. जेएनपीटीद्वारे देशातील विविध वस्तूंची निर्यात व आयात करणे सुलभ ठरत आहे.
coronavirus: जून महिन्यात जेएनपीटीद्वारे ८९ टक्के निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 1:49 AM