मुंबई : कोरोना विषाणूविरोधातील लढ्यासाठी भारतीय उद्योगक्षेत्राकडून सढळ हस्ते निधी दिला जात आहे. अब्जाधीश उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या वेदांता समूहाने भारतातील आपल्या खाणीतील रोजंदारी व कंत्राटी कामगारांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्याची घोषणा केली आहे. गरज पडल्यास निधीत आणखी वाढ केली जाईल, असे अगरवाल यांनी म्हटले आहे.प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आगामी काही महिन्यांचे आपले १०० टक्के वेतन कंपनीच्या समाजसेवा शाखेला देण्याची घोषणा केली आहे. वित्त वर्ष २०१९ मध्ये महिंद्रा यांना ९ कोटी रुपये वेतन मिळाले होते.पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्वदेशी व्हेंटिलेटर संशोधनासाठी ५ कोटी रुपये जाहीर केले आहेत. भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर प्रोटोटाइप बनविण्यासाठी आपली छोटी टीम काम करीत असल्याचे ‘आयआयएस’च्या एका प्राध्यापकाने टिष्ट्वटरवर म्हटले होते. त्याला प्रतिसाद देताना शर्मा यांनी ही मदत घोषित केली आहे.चीनमधील प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा यांच्या जॅक मा फाउंडेशन आणि अलिबाबा फाउंडेशन यांनी कोरोनाग्रस्तांसाठी भरघोस निधी देण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय उद्योगपतींनीही मदत जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. उद्योगपती आता पुढे येताना दिसत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोविड-१९ विषाणूवरील उपचार शोधण्यासाठी १०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे. विदेशी उद्योगपतींकडून भरघोस मदत जाहीर केली जात असल्यामुळे भारतीय उद्योगपतींवर समाजमाध्यमांतून जोरदार टीका केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर काही उद्योगपतींनी मदतीची घोषणा केली आहे.आनंद महिंद्रा यांनी याबाबत केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले की, आपल्या उत्पादन प्रकल्पांत व्हेंटिलेटर्सचे उत्पादन कसे करता येईल, यावर आम्ही लगेच काम सुरू केले आहे. महिंद्रा हॉलिडेजच्या रिसॉर्ट्सचे उपचार केंद्रात रूपांतरण करण्याची पूर्ण तयारी आम्ही करून ठेवली आहे.कामावरून काढणार नाहीवेदांता समूहाने म्हटले की, या संकटाच्या काळात कंपनी कोणालाही कामावरून काढणार नाही. तसेच कोणाचे वेतनही कापणार नाही. टाटा समूहानेही वेतन न कापण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारतात हिंदुस्तान युनिलिव्हरने सर्वांत आधी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी उद्योगक्षेत्राकडून भरघोस निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:05 AM