मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे देशासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे देशातील उद्योग व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे. आता लॉकडाऊन संपल्यानंतरही देशातील व्यवहार लवकर सुरळीत होण्याची शक्यता फार कमी आहे. तसेच पुढच्या काळात देशातील लोकांच्या खरेदीच्या सवयीत फार मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यामुळे काही कंपन्यांना फार मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतरही गर्दीबाबतचे नियम कठोर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीसाठी लोक घराबाहेर पडण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे गरजेच्या वस्तू, तसेच किराणा समानसुद्धा ऑनलाइन मागण्याचे प्रमाण वाढू शकते. अशा परिस्थितीत ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
मात्र ऑनलाइन व्यवहार वाढणार असल्याने ऑनलाइन कंपन्यांची जबाबदारी वाढणार आहे. या परिस्थितीचा विचार करून काही इ कॉमर्स कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या डिलिव्हरी बॉयच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान या कंपन्यांसमोर असेल.
आजच पिझ्झा डिलिव्हरी करणारा एक डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 72 कुटुंबाना क्वारेंटाईन करण्यात आले आहे. तसेच या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 17 डिलिव्हरी बॉयनासुद्धा क्वारेंटाईन करण्यात आले आहे.