नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून त्याचे आर्थिक परिणाम आता अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. विमान निर्मिती क्षेत्रातली जगातील बलाढ्य कंपनी असलेल्या एअरबसनं कर्मचाऱ्यांना पत्र लिहून येऊ घातलेल्या संकटाची कल्पना दिली आहे. कंपनीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यामुळे कर्मचारी कपात करावी लागणार असून त्यासाठी तयार राहा, असं पत्र एअरबसनं १ लाख ३५ हजार कर्मचाऱ्यांना पाठवलं आहे.
कंपनीकडे असणारी रोख रक्कम अतिशय वेगानं संपू लागली आहे. हे संकट अभूतपूर्व आहे, असं एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिलम फरी यांनी पत्रात म्हटलं आहे. कंपनीच्या उत्पादनात सातत्यानं घसरण होत असून त्याचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती पत्रात आहे. याबद्दल एका इंग्रजी वृत्त संकेतस्थळानं एअरबसला प्रतिक्रिया विचारली. मात्र हा कंपनीचा अंतर्गत पत्रव्यवहार असल्याचं म्हणत एअरबसनं प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
एअरबसनं शुक्रवारी रात्री कर्मचाऱ्यांना पत्र पाठवलं. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ताळेबंद जाहीर करण्यापूर्वी एअरबसनं कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून सद्यस्थितीची कल्पना दिली. कोरोनामुळे जवळपास संपूर्ण जगात लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा मोठा फटका हवाई वाहतूक क्षेत्रातल्या कंपन्यांना बसला आहे. याचे थेट परिणाम आता विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नावर दिसू लागले आहेत.
एअरबसनं सरकारी नियमांनुसार फ्रान्समधल्या ३ हजार कर्मचाऱ्यांना फर्लो योजनेनुसार सुट्टी दिली आहे. मात्र आता आणखी कठोर पावलं उचलावी लागतील, असं फरी यांनी पत्रात म्हटलं आहे. आता काही महत्त्वाचे निर्णय न घेतल्यास एअरबसचं अस्तित्वच धोक्यात येईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याआधी २००७ मध्ये एअरबस संकटात सापडली होती. तेव्हा १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता. आता कंपनीनं सर्व पर्याय खुले ठेवले असल्यानं कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
लॉकडाऊन संपणार की वाढणार?; आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार
'गाड्या सोडा, बसेस लावा पण त्यांची व्यवस्था करा', शिवसेनेचा सरकारला सल्ला
कोरोनामुळे महाराष्ट्रासह सहा राज्ये लॉकडाऊन वाढविण्यास सहमत?
CoronaVirus: नोकरी जाऊ शकते, तयार राहा; बलाढ्य विमान कंपनीचं सव्वा लाख कर्मचाऱ्यांना पत्र
विमान कंपनीच्या सीईओंचं १ लाख ३५ हजार कर्मचाऱ्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 10:35 AM2020-04-27T10:35:05+5:302020-04-27T10:37:17+5:30