नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगातील बहुतांश देशांत लॉकडाउन सुरू असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर सलग ५० व्या दिवशी गोठलेले (फ्रोझन) राहिले आहेत. त्याचबरोबर विमानाचे इंधन म्हणजेच जेट फ्युएल (एटीएफ) मात्र पेट्रोलपेक्षाही स्वस्त झाले आहेत. तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात तब्बल २३.२ टक्के म्हणजेच किलो लिटरमागे ६,८१२.६२ रुपयांची कपात केली असून, या कपातीनंतर दिल्लीत विमान इंधनाचे दर २२,५४४.७५ रुपये किलो लिटर झाले आहेत.
कार आणि दुचाकी वाहनात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलच्या तुलनेत विमान इंधनाचे दर आता एक तृतीयांशने कमी झाले आहेत. फेब्रुवारीपासून सहा वेळा करण्यात आलेल्या एटीएफच्या दरातील कपातीत ही सर्वांत मोठी कपात ठरली आहे. फेब्रुवारीमध्ये दिल्लीत एटीएफच्या दरात दोन तृतीयांश कपात झाली होती. दर कपात सुरू होण्याआधी दिल्लीत एटीएफचे दर ६४,३२३ रुपये किलो लिटर होते. ते आता २२,५४४.७५ रुपये किलो लिटर झाले आहेत. इतर महानगरांतही इंधन दरांत कपात झाली आहे.
दरम्यान, दिल्लीत पेट्रोल ६९.५९ रुपये लिटर, तर डिझेल ६२.२९ रुपये लिटर राहिले. मुंबईत पेट्रोल ७६.३१ रुपये, तर डिझेल ६६.२१ रुपये लिटर राहिले. चेन्नईत पेट्रोल ७२.२८ रुपये आणि डिझेल ६५.७१ रुपये लिटर राहिले. सरकारी मालकीच्या तेल वितरण कंपन्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, करोसीनच्या दरात १३.३ टक्क्यांची कपात करण्यात आलेली असून, विनासबसिडीचे केरोसीन आता ३९.६७ रुपये लिटर झाले आहे. याचाच अर्थ पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत आता केरोसीन खूपच स्वस्त झाले आहे.सार्वजनिक तेल कंपन्यांनी एटीएफच्या दरात नियमितपणे सुधारणा केली असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात मात्र १६ मार्चपासून कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही इंधनांवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे ३ रुपयांची वाढ केल्यानंतर दोन्ही इंधनाचे दर कंपन्यांनी ‘जैसे थे’ राखले आहेत. राज्य सरकारांनी मात्र इंधनावरील व्हॅटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या महानगरात इंधन दर काही प्रमाणात वाढले आहेत.