Join us

Coronavirus: संकटकाळात Amazon ने आणली बेरोजगारांसाठी मेगाभरती; ‘इतक्या’ पदांसाठी मागवले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 3:16 PM

जवळपास जगातील प्रत्येक देशाला लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत नुकसान सहन करावं लागत आहे.

ठळक मुद्देआर्थिक संकटात अनेक कंपन्या करतायेत कामगारांची कपात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे डबघाईलानोकरी गमावणाऱ्यांना अ‍ॅमेझॉन देणार काम करण्याची संधी

नवी दिल्ली – एकीकडे संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. जगातील २०० देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोना संक्रमित साखळी तोडण्यासाठी जगातील बहुतांश देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत.

जवळपास जगातील प्रत्येक देशाला लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत नुकसान सहन करावं लागत आहे. अनेक कंपन्या आर्थिक तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहेत तर काही कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती सतावत आहे. उद्योगधंदे बंद पडल्याने अनेक कंपन्यात कामगारांची कपात करत असल्याचंही निदर्शनास आलं आहे. अशात ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. मागच्या महिन्यात अ‍ॅमेझॉनने १ लाख कर्मचाऱ्यांना नोकरी दिली होती. तर आता ७५ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

अ‍ॅमेझॉनने १३ एप्रिल रोजी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्ही मागच्या महिन्यात १ लाख पदांसाठी भरती दिली होती. यातील नवीन कर्मचारी अमेरिकेच्या विविध ठिकाणी काम करून ग्राहकांची मदत करत आहे. कोरोना महामारीच्या संकटात अ‍ॅमेझॉनच्या सेवेला ग्राहकांची मागणी वाढत असून यासाठी आम्हाला अतिरिक्त ७५ हजार कर्मचाऱ्यांची नोकरभरती करावी लागत आहे. यासाठी बेरोजगारांनी अर्ज करावे असं आवाहन कंपनीने केलं आहे.

अ‍ॅमेझॉनद्वारे इतक्या वेगात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे ज्यावेळी अमेरिकेत मागील तीन आठवड्यात १ कोटी ६८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे बंद आहे अशापरिस्थितीत केवळ मनुष्यबळावर निर्भर असलेल्या कंपन्यांनी कामगारांची मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.

अ‍ॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे हे आम्हाला माहिती आहे. कारण हॉस्पिटॅलिटी, रेस्टॉरंट आणि ट्रव्हल्ससारख्या क्षेत्रातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा लॉकडाऊनमुळे त्यांना घरीच बसावं लागत आहे. त्यामुळे या लोकांचे अ‍ॅमेझॉनमध्ये आम्ही स्वागत करतो. त्यांना वाटत असेल तोपर्यंत ते अ‍ॅमेझॉनमध्ये काम करु शकतात. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही अथवा त्यांच्या जुन्या कंपन्या त्यांना कामावर बोलवण्यासाठी सक्षम होत नाही तोवर अ‍ॅमेझॉनमध्ये ते काम करु शकतात असं कंपनीने सांगितले आहे.

ई-कॉमर्स कंपन्या आर्थिक उलाढालीत वाढ

जरी अमेरिका किंवा अन्य देशात लॉकडाऊन असल्यामुळे नुकसान होत असेल तरी अ‍ॅमेझॉन आणि अन्य ई कॉमर्स कंपन्या या संकटकाळात आर्थिक सक्षम होत आहेत. कारण अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करणे हे काम सध्या ते करत आहेत. वालमार्ट अथवा भारतात डी मार्टसारख्या कंपन्याही फायद्यात सुरु आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअ‍ॅमेझॉन