मुंबई- सध्या देशभरात सगळीकडे लॉकडाऊन असल्याने अनेकांना घराबाहेर पडता येत नाही. यादरम्यान काही सेवा मिळविण्यासाठी लोकांना खूप संघर्ष करावा लागत आहे. भारतातील सर्वांत मोठी कॅश आणि पेमेंट्स सोल्यूशन्स कंपनी सीएमएस इन्फो सिस्टमने लोकांच्या सेवेसासाठी कॅश टू होम या नव्या सुविधेची घोषणा केली आहे. या सेवेमुळे जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पैशांसाठी घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांचे पैसे सुरक्षितरित्या त्यांच्यापर्यंत या सेवेद्वारे पोहोचविले जाणार आहेत.
जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना त्यांच्या घरी ‘कॅश टू होम’ सेवेद्वारे पैसे मोफत पोहोचविण्याची सुविधा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार दिली जाईल. गेल्याच वर्षी या सेवेसोबत जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना जोडले गेले. या लॉकडाऊन परिस्थितीत लोकांना आपला पगार आणि पेन्शन घेण्याची गरज पडते. याचवेळी सरकार डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरचे पैसे योग्य त्या व्यक्तीच्या खात्यात जमा करते. त्यामुळेच ही सेवा सहाय्यभूत ठरु शकते.
सीएमएस इन्फो सिस्टमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कौल म्हणाले की, अशा कठीण प्रसंगात समाजातील दुर्बल घटकांची सुरक्षा केली पाहिजे. ही सेवा सुरु करण्याची आत्यंतिक गरज आम्हांला जाणवली. संकट काळात लोकांपर्यंत त्यांचे पैसे सुरक्षित पोहोचविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आपण सगळेच आपल्या कुटुंबाचं आरोग्य विशेषत: मुले आणि घरातील जेष्ठ व्यक्तिंच्या आरोग्याविषयी चिंतित आहोत. त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू व सेवा पोहोचविणे आपली जबाबदारी आहे. त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवून त्यांना मानसिकदृष्ट्या सुरक्षित केले जाऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमचे २० हजार कर्मचारी आणि अन्य सहकारी यांच्या सक्षम सहकार्यामुळे ही सेवा देऊ शकतो. आमचे कर्मचारी सेवा २४ तास देण्यास तत्पर आहेत. सीएमएस ‘कॅश टू होम’ सुविधा सुरु करण्याची हीच योग्य वेळ आहे. अशावेळी नागरिकांना आपली बिले भागविण्यासाठी पैशांची गरज भासते. याच दरम्यान लोक आपला महिन्याच्या पगारातून बिले भरतात. ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळते पण ते घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे असं कंपनीने सांगितले आहे.
‘कॅश टू होम सर्विस’चा लाभ घेण्याकरिता पार्टनर बॅंकांची यादी पाहण्याकरिता ग्राहक https://www.cms.com/ या संकेतस्थळास भेट देऊ शकतात. सुरुवातीस सर्व राज्यांतील ५० ठिकाणी सीएमएस या सुविधेचे अनावरण करणार आहे. लवकरच १२५ हून अधिक ठिकाणी याचा विस्तार केला जाईल. डिस्टा या एआय एनेबल्ड लोकेशन इंटेलिजन्सच्या मंचाचा वापर करुन सुरक्षितरित्या ही सुविधा पुरवली जाणार आहे. ५ लाख नागरिक या सेवेचा लाभ घेतील. या सेवेच्या माध्यमातून सरासरी १० हजार रुपयांचे ते व्यवहार करु शकतात. या सेवेमुळे एकूण ५०० कोटी रुपयांचे वितरण केले जाईल. ज्यामुळे लोकांना त्यांचे पैसे गरजेच्या वेळी मिळेल असा सीएमएसला विश्वास आहे.