Join us

coronavirus : कोरोनामुळे रोजगार हिरावला, देशातील बेरोजगारीत प्रचंड वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 8:00 PM

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असून, त्याचा विपरीत परिणाम रोजगारनिर्मितीवर झाला आहे.

ठळक मुद्देकोरोलॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असून, त्याचा विपरीत परिणाम रोजगारनिर्मितीवर झाला आहेमार्च महिन्याचा विचार केल्यास या एका महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर गेल्या 43 महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनदरम्यान देशातील एकूण बेरोजगारीचा दर वाढून 23.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला.

मुंबई - संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा फैलाव आपल्या देशातही वेगाने होत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असून, त्याचा विपरीत परिणाम रोजगारनिर्मितीवर झाला आहे. लॉकडाऊननंतर देशातील बेरोजगारी वाढून 23 टक्के झाली आहे. तर शहरी भागात बेरोजगारीचा दर 31 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. मार्च महिन्याचा विचार केल्यास या एका महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर गेल्या 43 महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातील रोजगाराची अवस्था खूपच बिकट होऊ लागली. त्यानंतर महिन्याच्या अखेरीस परिस्थिती फार बिघडली. सीएमआयई ही एक खासगी संस्था असून, या संस्थेच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा देशातील रोजगार निर्मितीची अवस्था अधिक बिकट झाली.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनदरम्यान देशातील एकूण बेरोजगारीचा दर वाढून 23.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला. तर शहरी भागातील बेरोजगारीचा दर वाढून 30.9 टक्क्यांपर्यंत पोहोचला.  या अहवालानुसार संपूर्ण मार्च महिन्याचा विचार केल्यास या महिन्यात बेरोजगारीचा दर  8.7 टक्के राहिला. गेल्या 43 महिन्यातील हा सर्वाधिक बेरोजगारीचा दर आहे. या पूर्वी 2016 च्या मार्च महिन्यात बेरोजगारीचा दार 9.59 टक्के होता. 

देशात कोरोनाचा वाढत असलेल्या फैलाव विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा आणि किराणा दुकाने वगळता इतर सेवा पूर्णपणे बंद आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्थाकर्मचारीबेरोजगारी