मुंबई : कोविड-१९ साथीच्या काळात बदललेल्या परिस्थितीमुळे मुंबई विमानतळावरून टिअर-२ शहरांना जोडणाऱ्या विमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबई विमानतळमार्गे प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी ६४ टक्के प्रवासी बिगर-मेट्रो शहरांशी संबंधित होते.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबईला छोट्या शहरांशी थेट जोडणाऱ्या विमान उड्डाणांत मोठी वाढ झाली आहे. मुंबई-बरेली विमानांची आठवड्याला चार उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय अजमेर, पोरबंदर, तिरुपती आणि विशाखापट्टणमला जोडणारी १८ साप्ताहिक उड्डाणे सुरू झाली आहेत.
गेल्या महिन्यात ग्वाल्हेर थेट फ्लाइटने जोडण्यात आले. जानेवारी ते जुलै या काळात मुंबई विमानतळाने ७५ लाख प्रवाशांचे व्यवस्थापन केले. त्यातील ४८ लाख प्रवासी ६० बिगर-मेट्रो शहरांतून आले होते. यात हौसेने प्रवास करणारे प्रवासी जसे होते, तसेच आपले घर आणि कामाचे ठिकाण यादरम्यान प्रवास करणारे प्रवासीही होते. गोवा, अहमदाबाद, वाराणसी येथून येणाऱ्या प्रवाशांची संख्या या काळात वाढली.
स्थलांतरामुळे झाला हवाई वाहतुकीवर सुपरिणाम
- एशिया पॅसिफिक एव्हिएशनचे संचालक कपिल कौल यांनी सांगितले की, बिगर-मेट्रो ते मेट्रो मार्गावरील वाहतूक कोविड काळात मोठ्या प्रमाणात वाढली.
- कोविडच्या आधी मुंबईहून बिगर-मेट्रो शहरांना जोडणाऱ्या विमानांची संख्या क्षमतेअभावी कमी होती.
- गेल्या वर्षी छोट्या शहरांसाठी विमानांची मागणी वाढली. कारण स्थलांतरितांना आपापल्या गावी परतायचे होते.
- दोन महिन्यांच्या उड्डाणबंदीनंतर २५ मे रोजी विमाने सुरू झाल्यानंतर छोट्या शहरांतील उड्डाणांना गर्दी झाली.