Join us

coronavirus: कोरोनामुळे शहरी बेरोजगारीत मोठी वाढ, दुसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 8:10 AM

coronavirus: कोविड - १९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे शहरांतील बेरोजगारीत मार्चमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याआधीच्या तीन महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बेरोजगारी कमी झाली होती.

नवी दिल्ली : कोविड - १९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे शहरांतील बेरोजगारीत मार्चमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याआधीच्या तीन महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बेरोजगारी कमी झाली होती.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या मासिक आकडेवारीनुसार मार्चमध्ये शहरी बेरोजगारी २५ आधार अंकांनी वाढून ७.२४ टक्के झाली. शहरातील महिलांची बेरोजगारी जवळपास २ टक्क्यांनी वाढून १९.०७ टक्के झाली.श्रमशक्ती सहभागिता दर (एलएफपीआर) घसरला असून, त्यातून श्रम बाजारातील कमजोरी समोर येत आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये श्रमबाजारातून ३ दशलक्ष लोक कमी झाले आहेत. एलएफपीआर म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे आणि काम शोधणारे प्रौढ नागरिक होय. राष्ट्रीय बेरोजगारीचा दर मार्चमध्ये ६.५२ टक्क्यांनी घटला असल्याचे दिसत असले तरी श्रम बाजारातील स्थिती पाहता ही आकडेवारी दिशाभूल करणारी असू शकते.‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत ४०.५ टक्के असलेला एलएफपीआर मार्चमध्ये घसरून ४०.१७ टक्के झाला. हा मागील चार महिन्यांतील नीचांक ठरला. जानेवारीत तो ४०.६ टक्के, डिसेंबरमध्ये ४०.५६ टक्के आणि नोव्हेंबरमध्ये ४०.८ टक्के होता. शहरी भारतात एलएफपीआर ३७.२५ टक्क्यांवरून घसरून ३७ टक्क्यांवर आला आहे.देशाची एकूण श्रमशक्ती घसरून ४२५.७९ दशलक्षांवर आली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ती २.७ दशलक्षांनी कमी आहे. यात ग्रामीण भागातील श्रमिकांचा वाटा लक्षणीय आहे. अर्थव्यवस्थेत पुरेशा प्रमाणात रोजगार निर्मिती होत नसल्याचे मार्चमध्ये श्रम बाजार आणि एलएफपीआरमध्ये  झालेल्या घसरणीतून दिसून येत आहे. सन्मानजनक नोकऱ्या नसल्यामुळे लोक श्रमबाजारापासून दूर राहात आहेत, असे संकेतही या आकडेवारीतून मिळत आहेत. घडामोडी वाढल्या; पण...दिल्ली विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक अरूप मित्रा यांनी सांगितले की, अनेक क्षेत्रात आर्थिक घडामोडी  दिसून येत आहेत. तथापि, त्या खरोखर पूर्णांशाने काम करीत आहेत का, हा प्रश्न आहे. साथीच्या दुसऱ्या लाटेचा फटका किरकोळ विक्री आणि अतिथ्य क्षेत्राला बसला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू यामुळे लोकांच्या हालचालींवर नियंत्रण आले आहे. त्यातून लोकांचे उत्पन्न घटून देशांतर्गत मागणी घसरली आहे. उद्योग अजूनही संकटाशी झुंजत आहेत. हे सगळे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. 

टॅग्स :बेरोजगारीकोरोना वायरस बातम्याभारतअर्थव्यवस्था