मुंबई : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा देशातील विविध वस्तुंची मागणी तसेच रोजगार यांना गंभीर फटका बसल्याचे रिझर्व्ह बँकेने मे २०२१ साठी जारी केलेल्या आर्थिक बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले लॉकडाऊन व लॉकडाऊनसदृश निर्बंध यांमुळे आर्थिक घडामोडी मोठ्या प्रमाणात बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेत दिसून येत आहे. एप्रिल आणि मे २०२१ मध्ये अर्थव्यवस्थेचे सर्व निर्देशांक मंदावले आहेत. सर्वाधिक परिणाम मागणी व रोजगारावर झाला आहे. निर्बंधांमुळे वाहतूक व्यवस्था व आवागमन ठप्प झाले आहे. त्यातच लोकांनी बेछूट खर्चांना लगाम घातला आहे. त्यामुळे हा परिणाम झाला आहे. वस्तूंच्या साठ्यांवरही परिणाम दिसून येत असला तरी एकूण पुरवठ्यावर मात्र तुलनेने कमी परिणाम झाला आहे.
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, वित्त वर्ष २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीच्या प्रथमार्धात आर्थिक घडामोडी कमजोर झालेल्या नाहीत. अर्थव्यवस्थेची गती कमी झाली असली, तरी हा परिणाम गेल्या वर्षाएवढा तीव्र नाही. रिझर्व्ह बँक आणि सरकार यांनी गंगाजळी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचा चांगला परिणामही दिसून येत आहे. डिबेंचर्स जारी होण्याची प्रक्रिया गतिमान झाल्याचे दिसून आले आहे.
बिगरबँक वित्तसंस्थांकडून कर्जपुरवठा कमी बिगरबँक वित्तीयसंस्थांच्या (एनबीएफसी) बाबतीत अहवालात म्हटले आहे की, वित्त वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत एनबीएफसीचा ताळेबंद मंदावला होता. तरीही या संस्थांकडून कर्जपुरवठा सुरूच आहे. फक्त त्याची गती कमी झाली आहे. त्यातून या क्षेत्राचा चिवटपणा लक्षात येतो.