नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सरकारनं एक नवी योजना आखली आहे. याअंतर्गत कर्मचारी आणि कंपन्यांना दोघांनाही दिलासा देण्यात येणार आहे. कामगार मंत्रालय व्यापक योजनेवर काम करत आहेत. कारण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे कारखाना आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांच्या नोकऱ्या प्रभावित होत आहेत. याअंतर्गत एखादी कंपनी भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा जमा करण्यास उशीर करत असेल तर त्यावरील दंड माफ होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनच्या रकमेत दुप्पट वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांची पेन्शन 2 हजार रुपये करण्याचंही विचाराधीन आहे.एखाद्या कर्मचा-यास रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पीएफची रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यास त्वरित मंजूर करण्यात येणार आहे. याशिवाय नोकरी गमावल्यास किंवा संस्था, कंपनी बंद झाली तरी कर्मचार्यांना पीएफ काढणे सोपे होणार आहे. संकट काळात पीएफची रक्कम कामी येणार असून, पैशाची गरज लागल्यास ही रक्कम उपयुक्त ठरणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितले. यासंदर्भात आठवड्याभरात घोषणा होऊ शकते.कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षासध्याच्या नियमांनुसार कंपनीनं पीएफमधलं आपलं योगदान देण्यास उशीर केल्यास त्यांच्याकडून 12 टक्के वार्षिक व्याजाच्या स्वरूपात दंड आकारलं जातं. त्याशिवाय 2 ते 6 महिने उशीर झाल्यास 5 ते 25 टक्क्यांपर्यंत पेनल्टी द्यावी लागते. या पेनल्टीमधून कंपन्यांना दिलासा देण्याचं विचाराधीन आहे. याशिवाय किमान कर्मचारी पेन्शन योजनेची रक्कम एक हजार रुपयांवरून दोन हजार रुपये करण्यात येणार आहे. सध्या ते मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.
लाखो लोकांचं कमी होणार टेन्शन; आता दुप्पट होणार पेन्शन?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 4:58 PM