नवी दिल्ली : देशात कोरोनाची साथ वाढतच चालल्यामुळे स्वत:चे वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढत जाईल, असा अंदाज वाहन उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केला आहे. सूत्रांनी सांगितले की, कोरोना साथीमुळे सार्वजनिक वाहनांचा वापर संसर्गास निमंत्रण देणारा ठरू शकतो. लोकांचा संपर्क टाळण्यासाठी स्वत:चे वाहन हाच एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे कोरोनाची साथ अंतिमत: वाहन उद्योगास उपकारकच ठरणार आहे.
कोरोनामुळे सध्या २० राज्यांत कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे वाहन उद्योगातील पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे; पण लसीकरण जसजसे वाढत जाईल, तसतसे कार, एसयूव्ही, दुचाकी आणि स्कूटर यांची विक्रीही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीतील विक्रीची जय्यत तयारीही वाहन उद्योगाकडून केली जात आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, कोविड-१९च्या आणखी साथी येण्याचा धोका लक्षात घेऊन ग्राहक आपले स्वत:चे वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देतील, अशी शक्यता आहे.
त्यामुळे पहिल्या तिमाहीत जो काही तोटा आम्ही सहन करीत आहोत, तो पुढे भरून निघेल, अशी आशा आहे. सध्या देशात केवळ २० ते ३० टक्के वाहन शोरूम सुरू आहेत. त्यातील बहुतांश शोरूम ग्रामीण भागातील असल्यामुळे विक्री फारशी नाही. टाटा मोटर्सच्या विक्रीत एप्रिल व मेमध्ये ४० ते ४५ टक्के घसरण झाली आहे, असे चंद्रा यांनी सांगितले.
मारुती सुझुकीच्या मार्चमधील डाटानुसार, कंपनीच्या एकूण विक्रीत पहिली कार घेणाऱ्यांचे प्रमाण ४७ टक्के आहे. गेल्या वर्षी ते अवघे ३.५ टक्के होते.
आधीचे वाहन कायम ठेवून अतिरिक्त वाहन घेण्याचे प्रमाण ३०.१ टक्क्यांवरून ३३.७ टक्क्यांवर गेले आहे. जुनी कार देऊन नवीन घेण्याचे प्रमाण मात्र ७ टक्क्यांनी घसरले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही जुन्या कारची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसुन आली होती. संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा कमीत कमी वापर करण्यासाठी नागरिकांची जुन्या कारांना पसंती लाभली होती. त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये दुचाकींची खरेदीही मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र दिसून आले होते. त्यानंतर वाहन विक्री काही प्रमाणात मंदावली. पाठोपाठ दुसरी लाट आल्याने सध्या विक्री जवळपास ठप्पच झालेली आहे.
मागणी वाढण्याबाबत आशावादी
एका आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनांची मागणी वाढेल, यात शंकाच नाही. वैयक्तिक वाहन खरेदीचा जबरदस्त रेटा आहे. खरेदीदारांना कसे साह्य करायचे याचे मार्ग आम्ही शोधत आहोत. यासाठी जेवढी शक्य आहे ती सर्व मदत देण्याचा आमचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.