Join us

Coronavirus: कोरोनाचा फटका बसल्याने बाजारपेठेत निरुत्साह; दुसऱ्या लाटेत मध्यमवर्गीय होरपळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 7:21 AM

अर्थव्यवस्था रुळावर येण्यास लागू शकतो विलंब; तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमुळे आलेल्या आर्थ‍िक मंदीतून सावरण्यास शहरी भागातील मध्यमवर्गाचे मोठे योगदान राहिले होते. मात्र, यावेळी हाच वर्ग दुसऱ्या लाटेत सर्वाधिक होरपळला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्यास या वर्गाची फार मदत होण्याची शक्यता नाही, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशव्यापी लॉकडाऊनमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे हाल झाले. हा वर्ग या संकटासाठी सज्ज नव्हता. कोरोनाग्रस्त कुटुंबीयांच्या उपचारासाठी या वर्गावर पदरमोड करून गोळा केलेली गंगाजळी रिकामी करण्याची वेळ आली. मात्र, पहिली लाट ओसरू लागताच ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी लगेच वाढली. त्यावेळी सणासुदीच्या हंगामाने मागणी वाढण्यास हातभारही लावला. अनेक महिने बंधनांमध्ये राहिलेल्या मध्यमवर्गाने भरपूर खरेदी केली. त्यामुळे अर्थव्यवस्था डिसेंबरच्या तिमाहीमध्ये रुळावर येऊ लागली होती. 

दुसऱ्या लाटेनंतर मात्र अशी स्थिती राहणार नाही, असा अंदाज क्वांटेको रिसर्चच्या अहवालातून वर्तविण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये अनेक पटीने संसर्गाचे प्रमाण वाढले. लोकांना उपचारासाठी प्रमाणाबाहेर खर्च करावा लागला. त्यामुळे लाट ओसरल्यानंतरही गेल्या वर्षीप्रमाणे बाजारपेठेत उठाव राहण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

उच्च उत्पन्न गटामध्ये यंदा संसर्गाचे प्रमाण जास्तएका अहवालानुसार मुंबईत मोठ्या इमारतींमध्ये राहणारी समारे १ लाख ७० हजार कुटुंबे कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. त्या तुलनेत झोपडपट्टीतील १ लाख २० हजार कुटुंबे अशा झोनमध्ये आहेत. यावरून कोरोनाचा संसर्ग उच्च उत्पन्न गटातील कुटुंबांमध्ये जास्त झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ९० टक्क्यांनी वाढले आहे. त्यातच विविध राज्यांनी लॉकडाऊन लावले आहेत. त्यामुळे मागणी घटलेली आहे. याचा परिणाम वस्तूंच्या खरेदीवर होऊन व्यवसायीक व कारखानदार यांच्या नफ्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. 

दुसरी लाट अनपेक्षित आहे. त्यामुळे लोकांचा अनावश्यक खर्च टाळण्याकडे जास्त कल आहे. त्याऐवजी अनपेक्षितरीत्या उद्‌भवणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी बचत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. अनपेक्षितपणे उद्‌भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाची बाजु सांभाळण्यासाठी आरोग्य विमा वाढविण्याकडे मध्यमवर्गीयांचा कल दिसून येत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्था