नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे भारतासमोर दुहेरी आव्हान उभे राहिले असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे.
इंडिया टुडे ई संमेलनात सहभागी झालेल्या गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या महामारीने जगाला विचार करण्यास भाग पडले आहे. परिस्थिती कधी आणि कशी सुधारेल याबाबत अद्याप अनिश्चितता कायम राहील. दरम्यान, कोरोनामुळे जागतिक विकासदर तीन टक्क्यांच्या खाली येईल. भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेत इतकी घट दिसणार नाही.'दरम्यान, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतासमोर दोन आव्हाने उभी ठाकली आहेत, असे गीता गोपीनाथ यांनी सांगितले. भारताला कोरोनाह सामना करण्यासाठी दोन कामे करावी लागतील. भारताने कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत योग्य पावले उचलली आहेत. आता कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्या लागतील. दुसरी बाब म्हणजे, भारताला आर्थिक मोर्चावर वेगाने काम करावे लागेल. यामध्ये आरबीआयची भूमिका महत्वाची ठरेल,'' असे त्या म्हणाल्या.