नवी दिल्ली : कोरोना व्हायसरमुळे अनेक देशांमधील अर्थव्यवस्थेत घसरण होताना पाहायला मिळते. भारतातील अर्थव्यवस्थेत सुद्धा कोरोनामुळे परिणाम होत आहे. यातच केंद्र सरकार नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रत्येकवेळी पाऊल उचलत आहे. आता अर्थ मंत्रालयाने सर्व विमा धारकांना विमा धारकांना विम्याचे प्रिमियम भरण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी दिलासा दिला आहे.
अर्थ मंत्रालयाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये लॉकडाऊनमुळे ज्या विमा धारकांचे आरोग्य आणि मोटार (थर्ड पार्टी) विम्याचे नूतनीकरण झाले नाही. त्यांच्या अडचणी कमी करत सरकारने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, सर्व विमा धारक १५ मे किंवा याआधी रक्कन भरुन आपल्या विम्याचे नूतनीकरण करू शकतात.
दरम्यान, देशात कोरोनामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, २० एप्रिलपासून ज्याठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही, ते ठिकाणी एका नियमावलीनुसार लॉकडाऊनमध्ये सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
औद्योगिक क्षेत्राने २० एप्रिलपासून कोरोना फ्री भागात उद्योगांना मर्यादित सवलती देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, एसोचेमने (ASSOCHAM) म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत प्रति दिन २६००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सरकारने उद्योगांना होणाऱ्या लाखो कोटींच्या नुकसान भरपाईसाठी सहाय्यता आणि इकॉनॉमिक स्टिमुलस पॅकेज आणावे, अशी मागणी उद्योग क्षेत्राची मागणी आहे.