धनेंद्र कुमार
गेल्या काही वर्षांपासून जगभरातच ई-कॉमर्स क्षेत्र वेगाने वाढत आहे. प्रत्येक देशात एकूण रिटेल क्षेत्रातील ई-कॉमर्सचा वाटा वाढत आहे. यात डिजिटल तंत्रज्ञानाची भर पडली आणि घरातून आरामात, सुरक्षितपणे व्यवहार करण्याची सोय आणि सहजता यामुळे मागणीला चालना मिळाली. चीनसारख्या काही देशांमध्ये जागतिक निर्यात, लॉजिस्टिक आणि नाविन्य यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळाली. मात्र, कोविड-१९ मुळे काहीशी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. लॉकडाऊन, संपर्कावर बंधने आणि इतर प्रकारची बंदी, सर्वकाही ठप्प होणं यातून काही वेळा संबंधित भागधारकांमध्ये तणावही निर्माण झाला आणि यातूनच 'न्यू नॉर्मल' परिस्थितीत ग्राहकांमध्ये नवे प्राधान्यक्रमही निर्माण झाले.
सीसीआयतर्फे एप्रिल २०१९ मध्ये ई-कॉमर्ससंदर्भात एक अभ्यास-संशोधन करण्यात आले. उत्पादक, होलसेलर्स, रिटेलर्स, हॉटेल्स, रेस्तराँ, पेमेंट सिस्टम, ई-कॉमर्स व्यासपीठे अशा भागधारकांशी ९ महिने संवाद साधून बाजारपेठेचे विश्लेषण केले गेले आणि जानेवारी २०२० मध्ये यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यातून अनेक तथ्ये मांडली गेली आणि मुख्य म्हणजे स्व-नियमनाची गरज यात विषद करण्यात आली.
भारतीय स्पर्धा कायद्याचे स्वरूप पाहता, 'देशातील अर्थव्यवस्थेच्या विकासाचा' मूळ उद्देश, इतर अनेक मापदंडांसोबतच, 'स्पर्धेवर विपरित परिणाम होऊ देणाऱ्या कृती टाळणे, बाजारपेठेत स्पर्धेला वाव देणे आणि ती कायम राखणे, ग्राहकांचे हित जपणे आणि व्यापार करण्याचे स्वातंत्र्य राहील याची खातरजमा करणे' हे आहे आणि यातूनच हा विकास साधला जातो. अर्थव्यवस्थेचा विकास, स्थिरता आणि दमदार चलन तसेच ग्राहकांचे हित हा या स्पर्धा कायद्याचा पाया आहे.
भारत जगातील वेगानं वाढणारी ई-कॉमर्स अर्थव्यवस्था
बाजारपेठ नियामक म्हणून सीसीआयला कोरोना संकटाच्या ग्राहकांवर झालेल्या परिणामांची जाणीव आहे आणि या संकटाच्या काळातही ग्राहकांना साह्य करण्यासाठी तसेच योग्य पुरवठा सुरू ठेवण्यात व्यवसायांना आवश्यक नियोजनसाह्य पुरवण्यासाठी सुयोग्य आणि सखोल मार्गदर्शक तत्वे जारी करणाऱ्या जगातील काही पहिल्या संस्थांमध्ये त्यांचा समावेश होता. ही जाण आणि समावेशकता दर्शवणारे असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. भारत ही जगभरात एक सर्वाधिक वेगाने वाढणारी आणि सर्वात आकर्षक ई-कॉमर्स अर्थव्यवस्था मानली जाते.
भारतीय रिटेल क्षेत्र पाचव्या क्रमांकावर
आयबीईएफ अहवालानुसार भारतातील रिटेल क्षेत्र ८८३ अब्ज डॉलर्ससह जगभरात पाचव्या क्रमांकावर आहे आणि २०२४ पर्यंत हे क्षेत्र १.३ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे. यात ई-कॉमर्स क्षेत्र २०२४ पर्यंत १११ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल असा अंदाज आहे. देशात मोबाइल आणि इंटरनेटचा प्रचंड वापर वाढल्याने द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये ही वाढ अधिक वेगवान असेल. यातून रोजगार आणि नाविन्यतेलाही नवे आयाम मिळत आहेत, विविध क्षेत्रांमध्ये हजारो स्टार्ट-अप्स उभे राहत आहेत, जागतिक पीई आणि व्हीसीकडून प्रचंड प्रमाणात गुंतवणूक आकर्षित केली जात आहे. जागतिक संकटाच्या काळातही भारतात २०२१ च्या पाच महिन्यांमध्ये १४ युनिकॉर्न्स (लवकरच १५ होतील) पुढे आले. शिवाय, छोटे उद्योग, हस्तकला आणि सेवांना भारतात आणि परदेशात नव्या बाजारपेठा यातून खुल्या होत आहेत. औषधे, फार्मा आणि हेल्थकेअर, अन्न आणि रिटेल, प्रवास, हेल राइड, फिनटेक, सेवांची होम डिलिव्हरी, ओटीटी आणि इन-होम मनोरंजन या सगळ्यातच ई-कॉमर्सने कोविड-१९च्या काळात जणू तारणहाराची भूमिका पार पाडली. खरेतर, ग्राहकांचा प्राधान्यक्रम आणि परिस्थितीनुरुप गरजा याचा परिणाम वाढीवर झाला आहे.
ग्राहक हायब्रिड बाजारपेठेकडे
'न्यू नॉर्मल' परिस्थितीतील ग्राहकांचा प्राधान्यक्रम आणि विषाणूंच्या नव्या व्हेरिएंटमुळे एकामागोमाग येणाऱ्या लाटा पाहता ई-कॉमर्स आता भविष्य आहे अगदी कोविड-१९ पलिकडेही असेल, यात शंकाच नाही. ग्राहक आता बहुमाध्यम आणि हायब्रिड बाजारपेठांकडे वळत आहेत, ते ऑन-लाइन किमती आणि ब्रँड्सची तुलना करतात आणि मग ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष दुकानांतून खरेदी करतात, यातून ऑनलाइन वेबसाइट्स आणि होम डिलिव्हरीज सेवाही विकसित होत आहेत, या दोन्हीमध्ये योग्य किंमत आणि सुयोग्य डिलिव्हरी यासाठी स्पर्धा आहे आणि हे सगळेच स्पर्धा आणि ग्राहकांसाठीचे पर्याय यासाठी चांगलेच आहे. ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी हे दोन्ही घटक नव्या पद्धतींचा अवलंब करत आहेत, पारंपरिक दुकानेही डिजिटायझेशनकडे वळत आहेत, यात अनेकदा त्यांच्या हितासाठी लिंकेज निर्माण करण्यात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे साहाय्य घेतले जाते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित ग्राहकानुभव, दूरस्थ ऑन-साइट तुलना करण्याची सोय अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण पर्यायही उपलब्ध झाले आहेत.
फ्रेंच कवी आणि लेखक विक्टर ह्युगो यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. "ज्या कल्पनेसाठी योग्य वेळ आली आहे त्या कल्पनेपेक्षा अधिक बलशाली काहीही नसते." आजघडीला, ई-कॉमर्स क्षेत्राला हे वर्णन अगदी चपखल लागू पडते.
(लेखक हे वर्ल्ड बँकेत भारताचे माजी कार्यकारी संचालक आणि सीसीआयचे पहिले अध्यक्ष होते.)