मुंबई - कोरोना संक्रमणाच्या काळात सर्व प्रकारच्या उत्पादनांचा खप घटत असला तरी गेल्या तीन महिन्यांत देशात तब्बल ५ कोटी स्मार्टफोनची विक्री झाल्याची माहिती हाती आली आहे. कोरोना काळात ऑनलाइन, डिजिटल व्यवहारांमुळे स्मार्टफोन हाच जीवनातला अविभाज्य घटक ठरू लागल्याने आजवरच्या तिमाहीतल्या विक्रीचा विक्रम नोंदविण्यात आला.२०१७च्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत ४ कोटी ८ हजार स्मार्टफोनची विक्री झाली. २०१८मध्ये ती संख्या कमी होऊन ४ कोटी ४ हजारांवर आली. त्यानंतर गेल्या वर्षी त्यात लक्षणीय वाढ झाल्याने विक्री ४ कोटी ६० लाखांवर झेपावली होती. यंदा कोरोनाचे संक्रमण वाढत असलेल्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आजवरची विक्रमी अशी ५ कोटी फोनची विक्री झाली. जानेवारी ते मार्च या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के जास्त स्मार्टफोन विकले गेले. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून या तिमाहीत त्यात तब्बल ४७ टक्के घट झाली. मात्र, जुलै ते सप्टेंबर या गेल्या तिमाहीत २०१९ सालातील तिमाहीच्या तुलनेत ८ टक्के वाढ झाल्याचे स्मार्टफोन मार्केट प्लसची आकडेवारी सांगते.'ऑनलाइन'मुळे खरेदीची लगबगकोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात फिजिकल डिस्टन्सिंगचे निर्बंध लागू झाल्यानंतर परंपरागत दैनंदिन व्यवहार आणि कामकाजावर निर्बंध आले. त्या काळात मोबाइल फोन हेच संपर्काचे एकमेव साधन ठरले. शालेय शिक्षण, कार्यालयीन कामकाज, मोठमोठ्या कंपन्यांच्या जनरल मीटिंग इतकेच काय कुटुंबांच्या गाठीभेटी या डिजिटल प्लॅटफॉर्मवरच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोनचे महत्त्व वाढल्याने तो खरेदीची लगबग वाढली. येत्या उत्सव काळात त्यात आणखी भर पडेल अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
तीन महिन्यांत पाच कोटी स्मार्टफोनची विक्री, डिजिटल व्यवहारांमुळे वाढली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 4:12 AM