नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अल्प उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला गरीबांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात किमान एक हजार रुपये त्वरित जमा करावेत. तसेच पुढचे काही महिने सरकारने नागरिकांच्या खात्यात अशी रक्कम जमा करावी, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. याशिवाय अभिजित बॅनर्जी यांनी वन नेशन, वन रेशनकार्ड योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, असेही बॅनर्जी यांनी यांनी सांगितले.
दरम्यान, बॅनर्जी यांची पत्नी इस्टर डुफ्लो यांनी सांगितले की, सरकारने युनिव्हर्सल अल्ट्रा बेसिक इन्कम तत्काळ लागू करण्याची गरज आहे. जनधन योजना ही याचेच एक रूप आहे. मात्र अभिजित बॅनर्जी आणि इस्टर डुफ्लो यांनी केंद्र सरकारच्या वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेचे कौतुक केले. ही योजना त्वरित लागू करण्याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत कोरोनावर औषध सापडत नाही, तोपर्यंत कोरोनाचे संकट कायम राहील, असा सल्ला अभिजित बॅनर्जी यांनी दिला.
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर १९९१ पेक्षा मोठे संकट असल्याची भीती अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती. तसेच देशाच्या जीडीपीमध्येही मोठी घट होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. सध्या हातात पैसा नसल्याने भारतीय नागरिकांची खरेदी क्षमता घटली आहे. अशा परिस्थितीत सरकारने आर्थिक मदत करण्याच्या बाबतीत उशीर करता कामा नये, असेही अभिजित बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करताना सांगितले होते. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक मदत दिली पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
चिंताजनक! अॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात
पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप
कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई
लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवण्याची गरज आहे. मागणी तेव्हाच वाढेल जेव्हा लोकांमध्ये खरेदीची क्षमता असेल. सध्यातरी देशातील जनतेमध्ये खरेदी क्षमता नाही. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती पैसे पोहोचवण्याची गरज आहे. जेव्हा सर्वसामान्यांच्या हाती पैसे येतील, तेव्हा ते खरेदी करू शकतील. त्यांनी खर्च केल्याने मागणी वाढेल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला शक्ती मिळेल, असे बॅनर्जी यांनी सांगितले.