Join us

Coronavirus: ग्राहकांना खुशखबर, लॉकडाऊनमुळे जिओसह इतरही कंपन्यांनी वाढवली वैधता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 3:50 PM

जिओनेही आपल्या ग्राहकांना १७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली असून १०० मिनिट कॉलिंगही मोफत दिले आहे. तसेच १०० एसएमएसही फ्री देण्यात आले आहेत.

मुंबई - संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मानव जातीत मोठे संकट निर्माण झाले आहे. भारतातही कोरोनाचा फैलाव रोखाण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने देशातील उत्पादन क्षेत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. तर, नागरिकांनाही मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच, बँकांना पुढील ३ महिन्यांसाठी कर्जाच्या हफ्त्यात सवलत देण्याचा सल्ला आरबीआयकडून देण्यात आला आहे. आता, देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्रिपेड ग्राहकांना व्हॅलिटीडी वाढवून दिली आहे.  

ट्रायने केलेल्या आवाहनानुसार, देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांनी प्रिपेड ग्राहकांच्या प्लॅनची वैधता वाढवली आहे. त्यामुळे, ज्यांची वैधता संपली आहे, अशा ग्राहकांनाही लॉकडाऊन सुरू असेपर्यंत मोफत डेटा आणि कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. यामध्ये बीएसएनएल, एमटीएनएल यांसह जिओ, एअरटेल, व्होडा-आयडिया यांचाही समावेश आहे. भारतीय दूरसंचार नियम प्राधीकरणाने सोमवारी यांसदर्भात सर्वच दूरसंचार कंपन्यांना आवाहन केले होते. त्यानंतर, लगेचच बीएसएनएल आणि एमटीएनएलने २० एप्रिलपर्यंत आपल्या ग्राहकांची टॉकटाईम वैधता वाढवली आहे. तसेच १० रुपयांचा मोफत टॉकटाईमही देण्यात आला आहे. यासोबतच एअरटेलनेही प्रत्येक ग्राहकाची वैधता १७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. एअरटेलच्या ८ कोटी ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. 

जिओनेही आपल्या ग्राहकांना १७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली असून १०० मिनिट कॉलिंगही मोफत दिले आहे. तसेच १०० एसएमएसही फ्री देण्यात आले आहेत. १७ एप्रिलनंतरही ग्राहकांची इनकमिंग सेवा सुरुच राहणार असल्याचे जिओने म्हटले आहे. 

दरम्यान, देशातील अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला असून केंद्र सरकार पुढील सहा महिन्यात 4.88 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. ही माहिती आर्थिक व्यवहारविषयक बाबींचे सचिव आतानु चक्रवर्ती यांनी दिली. तसेच, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात बाजारामधून 7.8 लाख कोटी रुपये उधार घेण्यात येतील असा अंदाज व्यक्त केला होता. याचा अर्थ या रकमेतील 60 टक्के रक्कम पहिल्या सहा महिन्यात घेण्यात येईल.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याजिओबीएसएनएलआयडिया