Join us

CoronaVirus : पीपीएफ, सुकन्या समृद्धी खातेधारकांसाठी आनंदवार्ता, ठेव जमा करण्याची मुदत वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 8:51 AM

पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी ही खाती चालू ठेवण्यासाठी ठेवीदारांना दरवर्षी निश्चित किमान रक्कम जमा करावी लागते.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), आवर्ती डिपॉझिट (आरडी) आणि सुकन्या समृद्धी योजना खातेधारकांसाठी किमान ठेव जमा करण्याची अंतिम मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविली आहे.

वित्त मंत्रालयाने शनिवारी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. आता पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी खात्यात 2019-20 ची अनिवार्य किमान ठेव 30 जूनपर्यंत करता येणार आहे. वित्त मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरु असलेले लॉकडाऊन लक्षात घेऊन लहान ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी सरकारने पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी खातेदारांच्या तरतुदींमध्ये काही सवलत दिली आहे." 

दरम्यान, पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी ही खाती चालू ठेवण्यासाठी ठेवीदारांना दरवर्षी निश्चित किमान रक्कम जमा करावी लागते. ठेवीदारांनी किमान रक्कम जमा केली नाही, तर त्यांच्याकडून विलंब शुल्क आकारले जाते. आयकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत सूट मिळाल्यामुळे ठेवीदार सामान्यत: आर्थिक वर्षाच्या शेवटी या योजनांमध्ये पैसे जमा करतात.

टॅग्स :पीपीएफकोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्थागुंतवणूक