मुंबई - संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मानव जातीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. भारतातही कोरोनाचा फैलाव रोखाण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने देशातील उत्पादन क्षेत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पुढील सहा महिन्यात 4.88 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. ही माहिती आर्थिक व्यवहारविषयक बाबींचे सचिव आतानु चक्रवर्ती यांनी दिली हे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात बाजारामधून 7.8 लाख कोटी रुपये उधार घेण्यात येतील असा अंदाज व्यक्त केला होता. याचा अर्थ या रकमेतील 60 टक्के रक्कम पहिल्या सहा महिन्यात घेण्यात येईल. केंद्र सरकार आपली वित्तीय तूट भरून काढण्यासाठी बाजारातून पैसे उभारत असते. त्यासाठी बॉण्ड आणि ट्रेझरी बिल देण्यात येते. 2020-21 या आर्थिक वर्षात सरकारची वित्तीय तूट 7.96 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हा आकडा देशाच्या जीडीपीच्या 3.5 टक्के एवढा आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे सुमारे 120 अब्ज डॉलर (9 लाख कोटी रुपयांचे) नुकसान होण्याची शक्यता आहे, असा अंदाज एका वृत्तामधून वर्तवण्यात आला आहे. हे नुकसान देशाच्या एकूण जीडीपीच्या 4 टक्के आहे.